सौरभ ढोरे
काटोल (नागपूर) : ४२ जिल्हा परिषद शाळांमध्ये एकही शिक्षक नाही. जिल्ह्यात ७२५ शिक्षकांची तातडीने गरज आहे. मात्र, काटोल तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या आलागोंदी जिल्हा परिषद शाळेत एका विद्यार्थिनीला शिकविण्यासाठी दोन शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आलागोंदी शाळेची स्थापना २००१ मध्ये झाली. या शाळेत २०१८ ला राजेंद्र टेकाडे या शिक्षकाची बदली करण्यात आली होती. तेव्हा शाळेची पटसंख्या ४ होती. दोन वर्षांत विविध शैक्षणिक उपक्रमामुळे आदर्श शाळा म्हणून या शाळेने लौकिक प्राप्त केला होता. २०२० मध्ये येथे विद्यार्थीसंख्या १२ होती. कोविड काळात ही शाळा बंद पडली. यानंतर शिक्षक टेकाडे यांना जिल्हा परिषदेच्या अभ्यास केंद्रात स्थानांतरित करण्यात आले. याच काळात काही विद्यार्थी चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून इतर माध्यमिक शाळेत पाचव्या वर्गाच्या शिक्षणाकरिता निघून गेले. यानंतर येथे पहिल्या वर्गात एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही. आता या शाळेत इयत्ता तिसरीत वंशिका किशोर गजाम ही एकमेव विद्यार्थिनी आहे. तिला शिकविण्यासाठी गोपाल नेहारे व राजेंद्र टेकाडे दोन शिक्षक कार्यरत आहेत.
‘सीईओ’च्या आदेशाचे काय?
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौम्या शर्मा यांनी १९ जून रोजी आदेश काढत जिथे २० पेक्षा कमी पटसंख्या आहे व दोन शिक्षक कार्यरत आहेत तेथील एका कनिष्ठ शिक्षकाला २० पेक्षा अधिक पटसंख्या व एक शिक्षक कार्यरत असणाऱ्या शाळेत स्थानांतरित करण्यात यावे, असे निर्देश दिले होते. मात्र शिक्षण विभाग ‘सीईओ’च्या आदेशाकडे डोळेझाक का करतो आहे, हा प्रश्नच आहे.
हे आहे वास्तव
काटोल तालुक्यातील काही जि.प.शाळेत २० पेक्षा जास्त पटसंख्या आहे. याकरिता ६८ शिक्षकांची तातडीने गरज आहे. मात्र आलागोंदीप्रमाणे २० शाळेत २० पेक्षा कमी पटसंख्या असतानाही दोन शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे येथील शिक्षकांना इतरत्र स्थानांतरित करणे गरजेचे आहे.