लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर निवृत्त सेवकाला त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी पेन्शनचा आधार असतो. मात्र, काही निवृत्त सेवकांना ही पेन्शन मिळत नसल्याने ते अडचणीत आले आहेत. ईपीएफ ऑफिसमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत हा घोळ होत असल्याचे पुढे येत आहे.बऱ्याच शासकीय, निमशासकीय आणि खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला त्याच्या निवृत्तीनंतर एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑफिसमधून निवृत्तिवेतन मिळत असते. सेवेत असताना त्याच्या पगारातून होणाऱ्या कपातीतून संबंधिताच्या उत्तर काळासाठी ही योजना आहे. त्यासाठी प्रत्येक निवृत्तिवेतन (पेन्शन)धारकाला त्यासाठी हयात असल्याचे ‘जीवन प्रमाण’ प्रमाणपत्र भरून द्यावे लागते. नोव्हेंबर ते नोव्हेंबर असा या प्रमाणपत्राचा काळ असतो. पूर्वी जानेवारीपर्यंत हे प्रमाणपत्र भरून देण्याची मुभा होती. मात्र, त्यात सुधारणा करत आता हे प्रमाणपत्र नोव्हेंबरमध्ये भरणे व अपडेट करावे लागत आहे. मात्र, वृद्धत्वामुळे अनेक जण प्रमाणपत्र अपडेट करणे विसरतात. त्याबाबत कार्यालयाकडून तशी सूचनाही वारंवार दिली जाते. ही सर्व यंत्रणा ऑटोमॅटिक आहे. परंतु, मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गाने ही सर्व यंत्रणा विस्कळीत पडल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम अनेकांचे प्रमाणपत्र अपडेट झालेले नाहीत. शिवाय, ईपीएफओमध्येही कोरोना संसर्गाचा शिरकाव झाला आणि कोरोनामध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांचा बळीही गेला आहे. याचा फटका निवृत्तिवेतनधारकांना बसतो आहे.चार-पाच महिन्यापासून पेन्शनच नाही - चतारेमी ऑल इंडिया रिपोर्टरमध्ये नोकरीला होतो. २०१७ मध्ये सेवेतून निवृत्त झालो. निवृत्तिवेतन बरोबर खात्यात जमा होत होते. मात्र, गेल्या चार-पाच महिन्यापासून पेन्शन बंद झाली आहे. माझे जीवन प्रमाणपत्र अपडेट असतानाही ही समस्या होत आहे. मी स्वत: आजारामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. अशा अडचणीच्या काळातही पेन्शन मिळत नसेल तर काय अर्थ आहे, अशी भावना ओमप्रकाश चतारे यांनी व्यक्त केली.कर्मचाऱ्यांची उणीवकोरोनामुळे ईपीएफओमध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांचे निधन झाले आणि काही कर्मचारी क्वारंटाईन आहेत. अशा स्थितीत या समस्या निर्माण होत आहेत. अनेकांनी ऑटोमॅटिक यंत्रणेद्वारेही आपले जीवन प्रमाणपत्र अपडेट केले नाही. मात्र, हे प्रमाणपत्र अपडेट झाले की पेन्शन सुरू होईल, अशी माहिती ईपीएफओमधील एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
कोरोनाच्या काळात अनेकांची अडकली पेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 8:49 PM
अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर निवृत्त सेवकाला त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी पेन्शनचा आधार असतो. मात्र, काही निवृत्त सेवकांना ही पेन्शन मिळत नसल्याने ते अडचणीत आले आहेत. ईपीएफ ऑफिसमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत हा घोळ होत असल्याचे पुढे येत आहे.
ठळक मुद्देपीएफ ऑफिसमध्ये संसर्गाचा शिरकाव झाल्याचा परिणाम