नागपूर : बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा याने आईच्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाकरिता ४५ दिवसांची अकस्मात अभिवचन रजा (पॅरोल) मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
यापूर्वी त्याने या रजेसाठी विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. संबंधित नियमात बसत नसल्याच्या कारणावरून तो अर्ज नामंजूर करण्यात आला. परिणामी, त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. साईबाबा ९० टक्के दिव्यांग असून, तो दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता. तेथून तो नक्षल चळवळ हाताळीत होता. या प्रकरणात गडचिरोली विशेष शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड यांनी ऑगस्ट-२०१३ मध्ये अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्यानंतर ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा व त्याच्या साथिदारांना दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध साईबाबाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. ते अपील प्रलंबित आहे.
अर्जावर सुनावणी करण्यास नकार
साईबाबाच्या अर्जावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्या न्यायपीठासमक्ष सुनावणी होणार होती. परंतु, या न्यायपीठाने काही कारणांमुळे अर्जावर सुनावणी करण्यास नकार दिला. परिणामी, या अर्जावर दुसऱ्या न्यायपीठासमक्ष सुनावणी होईल. साईबाबातर्फे ॲड. आकाश सोरदे यांनी कामकाज पाहिले.