माओवादी साईबाबाला विविध गंभीर आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 08:40 PM2019-01-07T20:40:06+5:302019-01-07T20:41:01+5:30

बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याची तेलंगणा येथील खम्मामस्थित स्पंदन हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. गोपीनाथ यांनी नुकतीच वैद्यकीय तपासणी करून अहवाल दिला. त्यावरून साईबाबाला विविध गंभीर आजार असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे साईबाबाला वैद्यकीय कारणावरून जामीन मंजूर करण्यात यावा असा विनंती अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला आहे.

Maoist Saibaba has many serious diseases | माओवादी साईबाबाला विविध गंभीर आजार

माओवादी साईबाबाला विविध गंभीर आजार

googlenewsNext
ठळक मुद्देजामीन देण्याची हायकोर्टाला विनंती : कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. गोपीनाथ यांनी केली तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याची तेलंगणा येथील खम्मामस्थित स्पंदन हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. गोपीनाथ यांनी नुकतीच वैद्यकीय तपासणी करून अहवाल दिला. त्यावरून साईबाबाला विविध गंभीर आजार असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे साईबाबाला वैद्यकीय कारणावरून जामीन मंजूर करण्यात यावा असा विनंती अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला यावर दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितले. न्यायालयाने गोपीनाथ यांच्यासह काजीपेटस्थित प्रसाद हॉस्पिटलचे न्यूरो सर्जन डॉ. एन. प्रसाद व नवी दिल्ली येथील एम्सच्या जेरिअ‍ॅट्रिक मेडिसिन विभागाचे वरिष्ठ निवासी डॉक्टर हाजित भट्टी यांना साईबाबाची वैद्यकीय तपासणी करण्याची सशर्त परवानगी दिली होती. दरम्यान, राज्याच्या दक्षता विभागाने या तिन्ही डॉक्टर्सचे माओवाद्यांशी संबंध असल्याचा अहवाल सरकारला सादर केला. त्यामुळे सरकारने या डॉक्टर्सकडून साईबाबाची तपासणी करून घेण्याचा आदेश मागे घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती. परंतु, न्यायालयाने संबंधित आदेश मागे न घेता साईबाबाच्या तपासणीकरिता अधिक कठोर अटी लागू केल्या होत्या. त्यानंतर प्रसाद व भट्टी हे दोघेजण साईबाबाची तपासणी करण्याकरिता आले नाही. केवळ गोपीनाथ यांनीच साईबाबाची तपासणी करून अहवाल दिला. २६ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये साईबाबाची तपासणी करण्यात आली. न्यायालयात साईबाबातर्फे अ‍ॅड. आकाश सोरडे व अ‍ॅड. बरुणकुमार यांनी तर, सरकारतर्फे अ‍ॅड. प्रशांतकुमार सत्यनाथन यांनी कामकाज पाहिले.
साईबाबा ९० टक्के दिव्यांग
साईबाबा ९० टक्के दिव्यांग आहे. त्यासोबतच त्याला विविध गंभीर आजार झाले आहेत. ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा व त्याच्या साथीदारांना दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली आहे.

Web Title: Maoist Saibaba has many serious diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.