नागपूर, दि.26 - शहरात रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असले तरी, अनेक डांबरी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक बेजार झाले आहेत. मात्र वातानुकूलित कार्यालयांमध्ये बसलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नजरेला बहुतेक हे खड्डे दिसतच नाहीत. म्हणूनच की काय शहरात रोज खड्डे पडतात व रोज खड्ड्यांची दुरुस्ती होते, असे उत्तर नागपूर मनपातर्फे माहितीच्या अधिकारांतर्गत देण्यात आले आहे. जर रोज खड्ड्यांची दुरुस्ती होते, तर शहरातील हजारो खड्डे काय एका रात्रीत निर्माण झाले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. शहरातील खड्ड्यांची संख्या, बुजविण्यात आलेले खड्डे, खड्डे बुजविण्यासाठी प्राप्त व खर्च झालेली रक्कम इत्यादी प्रश्न उपस्थित केले होते. मनपाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, १ एप्रिल २०१४ ते १७ जून २०१७ या कालावधीत शहरात ४८ हजार २१७ खड्डे बुजविण्यात आले. यात हॉटमिक्स प्लॅन्टद्वारे बुजविण्यात आलेल्या ३६ हजार ७८ तर जेटपॅचरद्वारे बुजविण्यात आलेल्या १२ हजार १३९ खड्ड्यांचा समावेश आहे. शहरात रोज खड्डे पडतात व रोज दुरुस्ती होते. त्यामुळे खड्ड्यांची एकूण संख्येत माहिती देणे अशक्य असल्याचे मनपाच्या उत्तरात नमूद आहे. १ जानेवारी ते १७ जून २०१७ या कालावधीत शहरामध्ये ३,२८१ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा मनपाने केला आहे.
नागरिकांच्या तक्रारी स्वीकारत नाही का?मनपाकडे खड्ड्यांसंदर्भात नेमक्या किती तक्रारी आल्या, या प्रश्नाच्या उत्तरात आश्चर्यकारक माहिती देण्यात आली आहे. नगरसेवक, पदाधिकारी तसेच झोनचे सहआयुक्त यांच्या पत्र किंवा भ्रमणध्वनीद्वारे तक्रारी प्राप्त होते. त्यानुसार खड्ड्यांची संख्या ठरविण्यात येते, असे मनपाने सांगितले आहे. मात्र नागरिकांचा कुठेही उल्लेख नाही. नागरिकांच्या तक्रारी मनपा थेट स्वीकारत नाही का, असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.