नगर रचना विभागाची शुल्कवाढ : स्थायी समितीच्या बैठकीत एनडीएसच्या ९९ जवानांना मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या नगर रचना विभागाने दिलेल्या नकाशा शुल्कवाढीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीने सभागृहाकडे पाठविला आहे. यावर अंतिम निर्णय सभागृहात घेतला जाईल. सध्या ३० ते १६० रुपये शुल्क भरून नकाशाची प्रत मिळते. नवीन प्रस्तावानुसार यासाठी ७०० ते ६,८०० रुपये द्यावे लागणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी न देता सत्तापक्ष व विरोधी सदस्यांनी सभागृहाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला.
बैठकीत उपद्रव शोध पथकातील ९९ जवानांना ११ महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. एकूण २०१ पदे मंजूर असून, यातील १८० कार्यरत होते. परंतु २१ नोव्हेंबरला यातील ९९ जवानांचा करार संपला. विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघातील निवडणुकीमुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नव्हती. सध्या पथकामार्फत मास्क कारवाई, अतिक्रमण, नायलॉन मांजाची कारवाई केली जात आहे.
अंबाझरी तलावाच्या दुरुस्तीसाठी २१ कोटी ६ लाख ९२ हजार ८४३ रुपयाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यातील ३.१४ कोटी महामेट्रोकडून दिले जाणार आहे. उर्वरित १७.७१ कोटीची मागणी राज्य सरकारकडे केली जाईल. सध्या मनपा तीन कोटी देणार आहे. राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाल्यानंतर हा निधी परत मिळेल.