मंगेश व्यवहारे
नागपूर : उद्योग क्षेत्रात भारताचे नाव जगभरात पोहोचविणारे टाटा यांची नागपुरातही मिल होती. नागपूरची एम्प्रेस मिल कधी काळी नागपुरातील रोजगाराचा प्रमुख स्त्रोत होती. याच मिलमध्ये काम करणाऱ्या एक कामगाराला टाटाच्या कुटुंबाप्रती प्रचंड जिज्ञासा होती. मुळात हा मिल कामगार एक संग्राहक होता. त्याच्या संग्रहाच्या छंदापोटी त्याने टाटांच्या दुर्मीळ स्मृती गोळा केल्या, आजही त्या त्याने त्या जपल्या आहेत.
या मिल कामगाराचे नाव रुपकिशोर कनोजिया आहे. २० वर्षांचे असताना ते एम्प्रेस मिलमध्ये कामाला लागले. २००२ मध्ये मिल बंद पडली. या मिलच्या गोदामामध्ये असलेल्या टाटांच्या काही दुर्मीळ वस्तू त्यांच्या हाती लागल्या. यात एम्प्रेस मिलचा भव्य नकाशा त्यांना मिळाला. कनोजिया यांच्याकडे संग्रहाची दृष्टी पहिल्यापासूनच होती. त्यामुळे त्यांनी नकाशाचे मोल जाणाले आणि तो सांभाळून ठेवला. त्याप्रमाणे टाटांच्या संदर्भातील इतरही वस्तू गोळा करण्यास त्यांनी सुरुवात केली.
जेआरडी टाटा यांनी देशात पहिली एअरलाईन्स सुरू केली. १९५३ मध्ये एअरलाईन्सचे राष्ट्रीयीकरण करून जेआरडी टाटा त्याचे चेअरमन झाले. त्याबरोबर टप्प्याटप्प्याने त्यांनी इंटर स्टेट एअर लाईन्स सुरू केल्या. एअरलाईन्स सुरू करताना प्रत्येक वेळी प्रसिद्ध करण्यात आलेले फ्लाईट कव्हर कनोजिया यांच्याकडे आहेत.
याही दुर्मीळ गोष्टी संग्रहात
१९५८ मध्ये भारत सरकारने टाटावर पहिली डाक तिकीट काढली, भारतीय इस्पात उद्योगाच्या गोल्डन ज्युबिलीनिमित्त १९६५ मध्ये काढण्यात आलेली डाक तिकीट, जेआरडी टाटांवर १९९४ मध्ये भारत सरकारने डाक तिकीट काढली, जमशेदजी टाटांवर भारत सरकारने ५ रुपयांचा शिक्का काढला. टाटा ट्रस्टने जमशेदजी टाटांवर काढलेले पोस्ट कार्ड, औद्योगिक नगरी जमशेदपूरवर २००० मध्ये काढलेली डाकतिकिटं या महत्त्वाच्या स्मृती त्यांच्या संग्रहात आहेत. शिवाय जमशेदजी टाटांच्या कुटुंबातील दुर्मीळ छायाचित्र त्यांच्या संग्रही आहे.
- एम्प्रेस मिलचा इतिहास
एम्प्रेस मिलमध्ये मिळालेल्या पहिल्या पगाराची पावती. १९४० मध्ये मिलमध्ये झालेल्या संपात कर्मचाऱ्यांनी वापरलेल्या आंदोलनाचे साहित्य, मिलमधील कापडावर लागणारे टाटांचे लेबल, एम्प्रेस मिलचा वार्षिक अहवाल, १९२२ मध्ये एम्प्रेस मिलची गोल्डन ज्युबिली झाली, त्यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेले सोव्हीनिअर, मिल कामगारांना मिळणारी टाटाची टोपी, टाटाचे किचेन, टाटा ग्रुपतर्फे देण्यात येणारे ग्रिटींग त्यांच्याजवळ आहे.
- टाटांवरील निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक
देशातील वेगवेगळ्या भागातून त्यांनी या वस्तू संग्रही केल्या आहेत. रुपकिशोरसाठी या सर्व वस्तू अनमोल आहे. या संग्रही वृत्तीचा फायदा त्यांना टाटा ट्रस्टतर्फे आयोजित निबंध स्पर्धेत झाला. टाटांवर ही निबंध स्पर्धा होती. त्यात त्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.