ठळक मुद्देमहाल, रेशीमबाग, सक्करदरा परिसरात दुकाने केली बंद : गणेशपेठ बसस्टॅण्ड चौकात वाहतूक थांबविली
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, फडणवीस सरकार हाय हाय... अशा घोषणा देण्यात आल्या. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधीगेट परिसरात नारेबाजी केल्यावर या परिसरातील दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद केली. नवी शुक्रवारी चौक, सिरसपेठ, रेशिमबाग मार्गाने सक्करदरा चौकात शेकडो समाजबांधवांनी पूर्ण चौकातली वाहतूक रोखून धरली. आंदोलनकर्त्यांनी सक्करदरा परिसर, पोलीस स्टेशन, संगम टॉकीज, गजाजन मंदिर चौक मार्गाने लाँग मार्च काढून आवाज बुलंद केला. मराठा समाजाच्या मागणी व समस्येसंदर्भात गप्प राहून स्वत:ची राजकीय पोळी शेकणाऱ्या आजी माजी मराठा खासदार, आमदार, मंत्री, पदाधिकाºयांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. त्यानंतर आंदोलनकर्ते गणेशपेठ बस स्टँड चौकात जमा झाले. येथे १५ मिनिटे वाहतूक अडविण्यात आली. धावपळ करीत आलेल्या पोलिसांनी शेकडो आंदोलनकर्त्यांना अटक केल्याची माहिती नरेंद्र मोहिते यांनी दिली. या आंदोलनात नागपूर शहर मराठा महासंघ, मराठा युवा मंच, मराठा महिला मंच, मराठा समन्वय मंच, मराठा परिवार, मराठा विद्या प्रसारक समाज, मराठा विद्यार्थी महासंघ यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होेत. आंदोलनात जयसिंगराजे भोसले, बंटी शेळके, शिरीष शिर्के, बबलू साबळे, छोटू शिंदे, नितीन किरपाने, दत्ता शिर्के, बाल्या भोसले, शितल सुरुसे, छोटू पवार, लक्ष्मीकांत किरपाने, अनुप जाधव, विजय भोसले, आकाश पवार, रमेश पवार, नितेश गायकवाड आदींचा कार्यकर्त्यांचा सहभाग होता.