नागपूर : मराठा आंदोलकांलवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण आहे हे मी सांगू शकत नाही. ते मराठा समाजाला माहित आहे. मराठा समाजाचं डोकं फुटलं, या सगळ्यांमध्ये मराठा समाज बोध घेईल आणि तेच त्या जनरल डायरचा शोध घेतील व धडा शिकवतील, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी नागपुरात दिला.
वडेट्टीवार म्हणाले, जरांगे पाटील यांची भेट घेऊन उपोषण मागे घ्यावी अशी विनंती केली. आरक्षणाला आम्ही पाठिंबा देऊ, असेही सांगितले. यावेळी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. मात्र हे आरक्षण देताना ओबीसीची २७ टक्के असलेली मर्यादा वाढवून त्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आपण दिल्याचे त्यांनी सांगितले. सरकार येऊन सव्वा वर्ष झाले असूनही हा प्रश्न सुटला नाही. आंदोलकांवर अमानुष लाठीमार झाला. आता फक्त चौकशीची फार्स करून काहीच साध्य होणार नाही. २८ पैकी १८ मंत्री तुमच्या बरोबर असताना ते काय करत होते. शिंदे, अजित पवार, गुलाबराव पाटील, सामंत यांनी काय केले ? आधी आरक्षणाचा प्रश्न सोडवा मग तुमच्या सोबत येतो, असे एकनाथ शिंदे आणि अजित पवार का म्हणत नाही, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या
- मराठा आंदोलकांवर कलम ३०७ सारखे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. स्वातंत्र्यकाळापासूनचा इतिहास तपासला तरी या गावात एकावरही कुठलाही गुन्हा दाखल नाही. हे गाव शांतीप्रिय आहे. त्यामुळे आता सरकारने चौकशीचा फार्स करू नये व आंदोलकांवरील सर्व गुन्हे बिनशर्त मागे घ्यावे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.