लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना काळात सिनेमागृहे बंद असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक निर्मात्यांनी आपले सिनेमे नाईलाजाने ओटीटी प्लॅटाफॉर्मवर रिलिज केले. मात्र, या प्लॅटफॉर्मपासून मराठी सिनेमे फार लांब असल्याचेच दिसून आले. कोरोना संक्रमण, त्यामुळे लागू झालेली टाळेबंदी आणि आता संसर्गाचा वाढता प्रकोप बघता सिनेमागृहे इतक्यात उघडण्याची शक्यता कमीच आहे. केंद्र सरकारने १५ आॅक्टोबरपासून विशेष अटींसह सिनेमागृहे उघडण्याची परवानगी दिली असली तरी राज्य शासनाला याबाबत सुविधेनुसार निर्णय घेण्यास सांगितले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रच कोरोना हॉटस्पॉट असल्याने येथे केंद्र शासनाने अनलॉक संदर्भात घेतलेले सगळेच निर्णय सरसकट लागू होत नसल्याचेही वेळोवेळी दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने हिंदीतल्या अनेक चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी (ओव्हर दी टॉप मिडिया सर्व्हिसेस)वर आपले सिनेमे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्याच अनुषंंगाने मोठ्या बॅनरचे जवळपास सात-आठ सिनेमे प्रदर्शित झाले. या श्रुंखलेत प्रादेशिक विशेषत: मराठी सिनेमे कुठेच दिसले नाहीत. साधारणत: हिंदी चित्रपटाचा ट्रेण्ड मराठी व अन्य प्रादेशिक भाषेतील चित्रपट सृष्टीत दिसून येतो. मात्र, ओटीटी बाबत हिंदीला फॉलो करण्याचे धाडस प्रादेशिक चित्रपटांमध्ये नसल्याचे स्पष्टच झाले आहे. मराठीतले सगळे निर्माते सिनेमागृह उघडण्याची वाट बघण्यातच धन्यता मानत असल्याचे दिसून येते.नाट्यनिर्मात्यांनीही गुंडाळला गाशा: हिंदी चित्रपटसृष्टीने स्विकारलेल्या ओटीटी पर्यायाची भूरळ मराठी चित्रपट आणि नाट्यनिर्मात्यांनाही पडली होती. अनेकांनी घोषणाही केली होती. नाटकांसाठी तर हा आविष्काराचाच भाग ठरला होता. मात्र, यातील काही त्रुटी लक्षात आल्यावर ही भूरळ औटघटकेचीच ठरली. अनेक नाट्यनिर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मची तयारीही केली होती. मात्र, नंतर गाशा गुंडाळण्यातच धन्यता मानली गेली.चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग निराळा: हिंदी आणि मराठी चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग अगदी निराळा असल्यानेच मराठी चित्रपट निर्मात्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीचे अनुकरण करण्याचे टाळले. मराठी चित्रपट कन्टेन्ट, कथानक आणि अभिनयासाठी ओळखले जातात. त्यामुळेच, मराठी चित्रपट रसिकांचा विशेष असा वर्ग आजही कायम आहे. खेड्यापाड्यात मराठी चित्रपटांबाबत प्रचंड आपुलकी आहे. इंटरनेटचे जाळे सर्वत्र आहे, असे मानले जात असले तरी ती आभासी वास्तविकता आहे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मपासून आजही बहुतांश वर्ग अनभिज्ञ आहे. त्याचेच कारण म्हणून मराठी निर्मात्यांनी ओटीटीचा मार्ग स्विकारला नसल्याचे स्पष्ट होत आहे.प्रादेशिक भाषा असल्याने मराठीला ओटीटीवर प्रेक्षक भेटणार नाही, व्हीवूज मिळणार नाही आणि त्यामुळे रेव्हेन्यू जनरेट होणार नाही, अशी कारणे प्लॅटफॉर्मस कडून मराठी निर्मात्यांना सांगितली जातात. यात नफा दिसत नसल्याने निर्माते आपल्या चित्रपटांचे डिजिटल राईट्स द्यायला मागेपुढे बघतात.-
अंकूश मोरे, चित्रपट दिग्दर्शक.