लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर अनेक सहयोगी संस्था येण्यास इच्छुक असतात. परंतु, काही मंडळीच्या धोरणामुळे आजपर्यंत ते शक्य होत नव्हते़ मात्र, ३० जून रोजी नागपूर येथील विदर्भ साहित्य संघात पार पडलेल्या घटनादुरुस्ती समितीच्या तिसऱ्या बैठकीत महामंडळाच्या घटनेत दुरुस्तीला मान्यता मिळून सहयोगी संस्थांच्या नव्या वर्गवारीस मान्यता मिळाल्याने महामंडळाचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़.महामंडळाच्या इतिहासात अशाप्रकारची नवी वर्गवारी तयार करण्याचा निर्णय प्रथमच घेण्यात आला असून, घटनादुरुस्तीमुळे काही संस्थांची मक्तेदारी संपुष्टात येणार आहे. साहित्य क्षेत्रात नव्या नेतृत्वाला वाव मिळणार असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरू झाली आहे़ महामंडळाच्या सध्याच्या महाराष्ट्रातील चार घटक संस्था, बृहन्महाराष्ट्रातील पाच समाविष्ट व एक संलग्न संस्था यांच्याशिवाय अन्य इच्छुक संस्थांना महामंडळाचा भाग होण्याचा मार्ग या घटनादुरुस्तीमुळे मोकळा झाला आहे़ याबाबत महामंडळाचे अध्यक्ष डॉ़ श्रीपाद जोशी गेल्या चार दशकांपासून अशी वर्गवारी तयार करण्यासाठी आग्रही होते़ त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून विदर्भात महामंडळाचे कार्यालय आल्याची ही फलश्रुती आहे. यानुसार महामंडळाच्या धोरणांना सुसंगत अशारीतीने किमान २५ वर्षे नोंदणीकृत व कार्यरत संस्थांना या वर्गवारीत समाविष्ट केले जाणार आहे.प्रत्येक घटक संस्थेला १० सहयोगी संस्था जोडता येणार आहे़ महामंडळावर या १० सहयोगी संस्थांकडून सुचविलेला एक सदस्य घेतला जाणार आहे़ आता ही घटनादुरुस्ती महामंडळाकडून इतर घटक संस्थांकडे पाठविण्यात आली असून, घटक संस्थांकडून ठराव पारित झाल्यावर त्याची अंमलबजावणी होणार आहे़
अ.भा. मराठी साहित्य महामंडळात आता सहयोगी संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 10:17 AM
३० जून रोजी नागपूर येथील विदर्भ साहित्य संघात पार पडलेल्या घटनादुरुस्ती समितीच्या तिसऱ्या बैठकीत महामंडळाच्या घटनेत दुरुस्तीला मान्यता मिळून सहयोगी संस्थांच्या नव्या वर्गवारीस मान्यता मिळाल्याने महामंडळाचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़.
ठळक मुद्देमहामंडळाचे कार्यक्षेत्र होणार व्यापक