नागपूर : सध्या केंद्र सरकार वैद्यकीय व इंजिनिअरिंगसारखे विषयसुद्धा भारतीय भाषांमधून शिकवण्यावर भर देत आहे. राज्य सरकारनेसुद्धा याला प्रोत्साहन देण्याचे जाहीर केले आहे; परंतु दुसरीकडे पदवी अभ्यासक्रमांमधून मराठीसारखे विषय वगळण्याची बाब उघडकीस आली आहे.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या समाजकार्यच्या नव्या अभ्यासक्रमामध्ये बीएसडब्ल्यू पदवी अभ्यासक्रमाच्या तीन सत्रांतून मराठी-इंग्रजी हे विषय वगळण्यात आले आहेत. परिणामी समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक संकटात सापडले आहेत. त्यांच्या नोकरीवर टांगती तलवार असून, त्यांना अर्धवेळ होण्याची भीती आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची आखणी करताना समाजकार्य अभ्यास मंडळाद्वारे गठित केलेल्या मराठी अभ्यासक्रम समितीद्वारे बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमाच्या सर्व सहाही सत्रांकरिता आवश्यक मराठी व इंग्रजी या विषयाचे अभ्यासक्रम तयार करून देण्यात आले होते; परंतु समाजकार्य अभ्यास मंडळाच्या तत्कालीन अध्यक्षांनी मराठी व इंग्रजी हे विषय फक्त चारच सत्रांसाठी ठेवले होते. हे लक्षात आल्यावर मराठी, इंग्रजीच्या प्राध्यापकांनी कुलगुरू, माननीय प्र-कुलगुरू, माननीय कुलसचिव यांना निवेदने देऊन पूर्वीप्रमाणे सर्व सहाही सत्रांना मराठी, इंग्रजी हे विषय कायम ठेवण्यात यावेत, अशी विनंती केली होती.
माननीय कुलगुरूंनी, तसेच अधिष्ठाता यांनी कोणत्याही प्राध्यापकांचा वर्कलोड कमी होणार नाही, पूर्वीप्रमाणे सर्वांना परिपूर्ण वर्कलोड राहील अशी मौखिक हमी दिली होती; परंतु सोमवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या समाजकार्यच्या नव्या अभ्यासक्रमामध्ये बीएसडब्ल्यू पदवी अभ्यासक्रमाच्या फक्त तीनच सत्रांना (सत्र-१, ३ व ५) मराठी व इंग्रजी हे विषय ठेवण्यात आले, तर सत्र २, ४ व ६ या सत्रांतून मराठी इंग्रजी हे विषय वगळण्यात आले आहेत.
सध्या कार्यरत समाजकार्य टास्क फोर्सने इंग्रजी व मराठी हे विषय बीएसडब्ल्यू पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, तृतीय व पाचव्या सत्रांना ठेवले, तर दोन, चार व सहा या सत्रांतून हे विषय बाद केले, त्यामुळे समाजकार्य महाविद्यालयातील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्राध्यापकांवर अर्धवेळ होण्याची वेळ आहे.