परिवहन विभागाचे निर्देश : पत्रकारांची घेणार मदतनागपूर : राज्यात काही ठिकाणी आॅटोरिक्षा परवान्यांचे लॉटरी पद्धतीने फेरवाटप करण्यात आले आहे. यांना अंतिम इरादापत्रे देण्यापूर्वी त्यांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची मौखिक चाचणी घ्यावी, अशा आदेशाचे पत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयात शनिवारी धडकले. विशेष म्हणजे, ही चाचणी पत्रकारांसमक्ष घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.राज्यातील नागपूर, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक व औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील एकूण ४२ हजार ७९८ आॅटोरिक्षा परवान्यांचे लॉटरी पद्धतीने फेरवाटप १२ जानेवारी २०१६ रोजी करण्यात आले. यात परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असल्याची अट ठेवण्यात आली होती. त्या दृष्टीने अर्जदार आॅटोचालकांच्या मराठी भाषेचे ज्ञान तपासून घेण्याचे निर्देश परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) दिले आहे. या चाचणीसाठी पुरेशा संख्येने पत्रकारांची नियुक्ती करण्याचे व चाचणी घेताना त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगदेखील करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही चाचणी २९ फेब्रुवारी ते ५ मार्च २०१६ पर्यंत चालणार आहे. एका पत्रकारासमक्ष प्रतिदिवस ५० याप्रमाणे पत्रकारांच्या संख्येचे नियोजन करण्याच्या सूचनाही प्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. चाचणीसाठी उमेदवारास मराठी पुस्तकातील सुमारे १० ओळींच्या परिच्छेदाचे वाचन करावे लागणार आहे. अशिक्षित उमेदवारास रिक्षा प्रवाशांशी सर्वसाधारणरीत्या होणाऱ्या संवादातील माहितीशी संबंधित १० प्रश्न विचारले जातील. यशस्वी उमेदवाराला त्याच दिवशी इरादापत्र दिले जाणार आहे.(प्रतिनिधी)
आॅटो परवान्यासाठी मराठीची चाचणी
By admin | Published: February 21, 2016 2:45 AM