लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी भाषेचा विषय आला की सर्व जण शासनाकडे बोट दाखवितात. हा शुद्ध नाठाळपणा आहे. शासन विविध मंडळ स्थापून, खर्च करून त्यांच्या स्तरावर मराठीच्या संवर्धनाचे कार्य करीत असते. मात्र मराठी भाषा टिकविणे मराठी बोलणाऱ्या मध्यमवर्गीय माणसांची जबाबदारी आहे. आपण घरी, व्यवहारात मराठी वापरतो का, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी येते. सहज वापरता येतील असे शब्दही बोलत बोलत नाही. संत वाङ्मय, लेखकांच्या साहित्याचा वारसा आहे, मात्र वाचन नाही, संदर्भ शोधले जात नाही. परंपरेशी धागा तुटलेला आहे. मराठी माणसांमध्ये असलेल्या बौद्धिक आळसामुळेच मराठी भाषेची दुरवस्था होते, असे परखड मत ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केले.वनामतीच्या सभागृहात सुरू असलेल्या १६ व्या जागतिक मराठी संमेलनात शनिवारी त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. चंद्रकांत कुळकर्णी आणि डॉ. श्रीकांत तिडके यांनी त्यांची मुलाखत घेतली. खास महेश एलकुंचवार यांच्या दिलखुलास शैलीचा परिचय प्रेक्षकांना आला.मराठीच्या संवर्धनाबाबतमराठीच्या मुद्यावर त्यांनी दूरचित्रवाणीवर चालणारे कार्यक्रम, नव्या लेखकांचे लिखाण आदींवर शेरे मारले. वाचन नसल्याने संदर्भ माहिती नसलेले काही लेखक अलंकारिक लिहिण्याच्या प्रयत्नात नको ते शब्द वापरून स्वत:चे हसे करून घेतात. बाहेर मराठी बाण्याचा अभिमान बाळगणारे घरात मात्र मराठीचा उपयोगच करीत नाही. पालकांचे लक्ष सातव्या वेतन आयोगाच्या पगारवाढीकडे असते. मराठीची वातावरण निर्मिती करण्यात आपण कमी पडलो. आपला वारसा विसरलो. असा सांस्कृतिक भिकारडेपणा आला असताना, तरुण पिढीला दोष देण्यात अर्थ काय, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीयांवर मराठी टिकविण्याची जबाबदारी असल्याचे मत त्यांनी मांडले.मेरिटवर शिक्षकांची नियुक्तीमराठी संवर्धनासाठी शासन काही गोष्टी करू शकते. मुलांमध्ये प्राथमिक स्तरावरच मराठीची ओढ लावणे आवश्यक असल्याने प्राथमिक व माध्यमिक स्तरावर मेरिटच्या आधारावर गुणवत्ताधारक शिक्षकांची नियुक्ती करावी व त्यांना अधिक पगार द्यावा. शक्य झाल्यास विविध विषय मराठीतूनच शिकविण्याची व्यवस्था करावी. इतर भाषा शिकणे तितकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या भाषांचे ज्ञान घेणे आवश्यक असल्याचेही मत त्यांनी मांडले.अपयश ही सुंदर गोष्टमाझं प्रत्येक नाटक अयशस्वी वाटत असल्याची भावना मांडत प्रत्येक लेखकाच्या आयुष्यात अपयश येणे अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.बर झालं, ५० वर्षांनंतर मी राहणार नाहीमाणसांची भावनाही कलुषित झाली आहे. खेड्यातही आता हे जाणवू लागले आहे. आत्मीयता नाहीशी झाली असून त्यात जातीयता, राजकारण शिरले आहे. नातेसंबंधात कोरडेपणा, बरडपणा आला आहे. आपण डोळे उघडे ठेवून वाळवंट निर्माण करतो आहे. ज्या वेगाने हे बदलत आहे, त्यावरून ५० वर्षानंतर भारत कसा असेल, हा विचार भयावह वाटतो. बर झालं, तोपर्यंत मी राहणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.मुंबईला न जाण्याची खंत नाहीअनेकजण मला मुंबईला गेले असते तर प्रसिद्धी आणि प्रगती वाढली असती, असे म्हणतात. पण मला पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवायची नव्हती. आणि यासाठी तासन्तास लोकलमध्ये लटकणे तर नाहीच नाही. वैदर्भीय आळसपणा, म्हणा हवा तर पण निवांतपणा हवा आहे. दगदग नको, आयते मिळाले तर ठीक आहे, असे म्हणत त्यांनी हंशा पिकविला.म्हणून नाटक लिहिणे सोडलेनाटक ही सामूहिक कला असते आणि त्यातील सर्वात सुंदर काळ नाटक सादर होण्याचा किंवा पुरस्कार मिळण्याचा नसतो, तो काळ रिहर्सलचा असतो. या तालमीच्या काळात आंतरिक संबंध मजबूत होतात व हीच खरी मानवी जीवनाची गंमत आहे. मात्र नंतरच्या काळात हे आंतरिक संबंध तुटत गेले. चर्चात्मक काम बंद झालं व प्रत्येकाचे काम वेगळे झाले. जो तो आपला एजंडा पुढे सरकवू लागला. तुम्ही लेखक आहात, तुमचे काम झाले. आता आम्ही आमचे बघू, असे अनुभव येऊ लागले व माझा भ्रमनिरास होत गेला. ते नाटक पाहताना हे आपले नाटकच नाही, असे वाटायचे. म्हणून मी नाटक सोडून दिले आणि ललित निबंध लेखन सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. नाटक हे परावलंबी आहे. ललित लेखन तसे नाही, त्यात कोणी मध्यस्थ येत नाही. त्यामुळे यात जास्त व्यक्त होता आल्याची भावना एलकुंचवार यांनी व्यक्त केली. पुरस्कार वापसीच्या वेळी सरकारचे चुकलेसरकारच्या विरोधात जेव्हा अनेक साहित्यिकांनी पुरस्कार वापसी केली तेव्हा सरकारने या साहित्यिकांना बोलावून त्यांचे म्हणणे जाणून घेणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही, हे योग्य नाही. असे न करता साहित्य अकादमीच्या अध्यक्षांनी थेट नयनतारा सहेगल यांच्यासारख्या मोठ्या लेखिकेला ‘आम्ही तुम्हाला पैसे आणि पुरस्कार देऊन प्रसिद्धी दिली’, असे बोलले. नयनतारा या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नात्यात असूनही त्यांनी आणीबाणीच्या संपूर्ण काळात त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. एखाद्याचे कतृत्व माहिती न करता, असे बोलणे हे करंटेपणाचे असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रीयांच्या बौद्धिक आळशीपणामुळे मराठीची दुरवस्था : महेश एलकुंचवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 12:24 AM
मराठी भाषेचा विषय आला की सर्व जण शासनाकडे बोट दाखवितात. हा शुद्ध नाठाळपणा आहे. शासन विविध मंडळ स्थापून, खर्च करून त्यांच्या स्तरावर मराठीच्या संवर्धनाचे कार्य करीत असते. मात्र मराठी भाषा टिकविणे मराठी बोलणाऱ्या मध्यमवर्गीय माणसांची जबाबदारी आहे. आपण घरी, व्यवहारात मराठी वापरतो का, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी येते. सहज वापरता येतील असे शब्दही बोलत बोलत नाही. संत वाङ्मय, लेखकांच्या साहित्याचा वारसा आहे, मात्र वाचन नाही, संदर्भ शोधले जात नाही. परंपरेशी धागा तुटलेला आहे. मराठी माणसांमध्ये असलेल्या बौद्धिक आळसामुळेच मराठी भाषेची दुरवस्था होते, असे परखड मत ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्दे जागतिक मराठी संमेलनात खुशखुशीत मुलाखत