नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून निघणारी मारबत मिरवणूक यंदा निघणार नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १८ ऑगस्ट रोजी साजरा होणारा बैल पोळा, १९ ऑगस्टला साजरा करण्यात येणारा तान्हा पोळा सण सार्वजनिक ठिकाणी तसेच सामूहिक स्वरुपात साजरा करण्यास प्रतिबंध घातला आहे. तसेच १९ ऑगस्टला साजरा होणारा मारबतीचा कार्यक्रम व मिरवणूक काढण्यावर प्रतिबंध घातला आहे.
नागपुरात बैल पोळा, तान्हा पोळा आणि मारबत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दरवर्षी हजारो लोक या कार्यक्रमात सहभागी होतात. या गर्दीत सामाजिक अंतर ठेवणे अतिशय कठीण असल्याने कोविड-१९ च्या संसर्ग वाढण्याची शक्यता या कार्यक्रमामुळे नाकारता येत नाही. मनपा आयुक्तांनी लोकहिताच्या दृष्टीने व नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याचा हितास्तव कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार मारबत दहनाचा कार्यक्रम टाळण्याचा आग्रह केला आहे. परंतु दहन करणे जर परंपरेनुसार आवश्यक असल्यास तो साजरा करताना पाच पेक्षा जास्त नसतील इतक्या व्यक्तिंच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून व त्रिस्तरिय मास्क घालून मनपा तसेच पोलीस विभागाची पूर्व अनुमती प्राप्त करून नियमानुसार साजरा करता येईल. आयुक्तांनी नागरिकांना घरीच सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे. जर आदेशाचे उल्लंघन झाले तर भादंवि कलम १८८ व अनुषंगिक कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.