लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवरात्रोत्सवात सप्तमी, अष्टमी, नवमीसह दसऱ्याला झेंडू आणि शेवंती फुलांना चांगली मागणी असते. सीताबर्डी येथील ठोक फूल बाजारात आवक कमी असल्याने दहा दिवसांपूर्वी २० रुपये किलो भावात मिळणारे झेंडू २०० रुपये आणि शेवंतीचे भाव ४०० रुपये किलोवर गेले आहेत. त्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. भाव मिळाल्याने उत्पादक शेतकरी आनंदी आहेत.
कोरोना महामारीत नागपूर जिल्ह्यासह अन्य भागातील फूल उत्पादकांना विक्री बंद असल्याने फुले फेकून द्यावी लागली होती. कोरोनाचे संकट किती दिवस राहील, या भीतीने उत्पादकांनी लागवड कमी केली. लग्नसमारंभ नसल्याने शेतकऱ्यांनी सजावटीच्या फुलांवर भर न देताना पूजेच्या फुलांची लागवड केली. आता नवरात्रोत्सव आणि दसऱ्याला भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी उत्साही आहेत.
ठोक फूल बाजार असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, दहा दिवसापूर्वीच्या तुलनेत झेंडू आणि शेवंती फुलाला भाव मिळत आहे. यंदा नवरात्रोत्सवात हव्या त्या प्रमाणात आवक झाली नाही. त्यामुळे भाव वाढले आहेत. शनिवारी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे कोरोनाची भीती न बाळगता लोकांनी बाजारात गर्दी केली. रणनवरे म्हणाले, सीताबर्डी येथील मुख्य ठोक बाजारात गुरुवारपासून दररोज दीड टनाच्या ५० ते ६० गाड्यांमध्ये फूल येत आहेत. शनिवारी सकाळी ७० ते ८० रुपये किलो भाव होते. मागणी वाढताच भाव १५० रुपयांवर गेले. अखेर २०० रुपये किलो भावाने विक्री झाली. झेंडू तीन प्रकारात येतो. झेंडू मोठा हायब्रीड, कोलकाता कुडी, छोटा नवरंग आदींचे भाव १५० ते २०० रुपयांदरम्यान होते. याशिवाय पांढऱ्या शेवंतीला शनिवारी सकाळी २०० रुपये भाव होते. चांगल्या प्रतीच्या फुलाचे भाव ४०० रुपये किलोवर पोहोचले होते. रविवारी दसऱ्याला भाववाढीची शक्यता आहे.
अवकाळी पावसाने हैदराबाद, बेंगळुरू, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर जिल्ह्यातील फुले खराब झाली. सध्या बाजारात नागपूर जिल्हा, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला येथील झेंडू व शेवंती बाजारात विक्रीसाठी येत आहेत. दरदिवशी ५० ते ६० गाड्यांची (प्रत्येक गाडी दीड टन) आवक आहे. तीन दिवसात जास्त उलाढाल झाली. शेतकऱ्यांनी दसऱ्यानंतर दिवाळीची वाट पाहावी लागेल. मधल्या काळात किमती कमी होतील, त्यानंतर दिवाळीत पुन्हा किमती वाढतील, असे रणनवरे यांनी स्पष्ट केले.