कामठी (नागपूर) ः ओल्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने केजी टू पीजी शिक्षण मोफत देण्याचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी मुंबई बाजार समितीचे सभापती हुकुमचंद आमधरे यांनी सरकारला दिलेल्या निवेदनात केली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले. दुबार पेरणी केल्यानंतरही शेतकऱ्यांचे पीक पावसामुळे हातून गेले. यातून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जुलै महिन्यापासून शाळांना सुरुवात होते. मात्र, मुलांच्या शिक्षणासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याचे दिसून येत आहे.
शिक्षणाचे खासगीकरण झाल्यामुळे खासगी शाळेत मुलांना मोठे शुल्क द्यावे लागते. सध्या शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यातून बाहेर निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची योजना सरकारने सुरू करावी. केजी टू पीजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या त्याप्रमाणे व्यावसायिक शिक्षणही मोफत देण्यात यावे, अशी मागणी हुकुमचंद आमधरे यांनी केली आहे. सरकारने वेळीच शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या काळात शिक्षण न घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, असा इशाराही हुकुमचंद आमधरे यांनी सरकारला दिलेल्या निवेदनात केला आहे.