श्याम नाडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : कृषी उत्पन्न्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील केदार गट व आशिष देशमुख यांच्यात विभागले आहेत. त्यांच्यातील आराेप व प्रत्याराेपांच्या फैरींमुळे नरखेड तालुक्यातील राजकीय आखाडा चांगलाच रंगला आहे. उमेदवार गटागटाने मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर देत आहेत.
या बाजार समितीवर २६ वर्षापासून आ. अनिल देशमुख गटाचे वर्चस्व आहे. नऊ वर्षांपासून याच गटाचे बबन लोहे सभापती आहेत. सहकार क्षेत्रात पकड असलेल्या सुरेश आरघोडे यांना शह देण्याकरिता त्यांचा मुलगा अमोल आरघोडे याला डावलून राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील स्थानिक नेत्यांनी बबन लोहे यांना सभापतिपद बहाल केले हाेते. त्यांच्या कार्यशैलीमुळे संचालकांमध्ये फूट पडली होती.
आ. अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बंडाेपंत उमरकर, सुरेश आरघोडे, नरेश अरसडे, सतीश रेवतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे, काँग्रेसचे सुदर्शन नवघरे महाविकास आघाडी पॅनलच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. माजी आ. आशिष देशमुख यांनी बबन लोहे यांना जवळ करून भाजपशी हातमिळवणी केली व बळीराजा सहकार पॅनल रिंगणात उतरविले. या पॅनलच्या प्रचाराची धुरा डॉ. आशिष देशमुख, भाजपचे उकेश चव्हाण, मनोज कोरडे सांभाळत आहेत. दुसरीकडे, व्यापारी मतदारसंघातून विद्यमान संचालक मुशीर शेख व संदीप बालपांडे हे स्वतंत्र निवडणूक लढवित आहे.
...
मतदान व मतमाेजणी
नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सध्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (केदार गट) व शिवसेना यांचे महाविकास आघाडी पॅनल व काँग्रेस (डॉ. आशिष देशमुख गट) व भाजप यांच्या बळीराजा सहकार पॅनल यांच्यात थेट लढत आहे. एकूण १८ संचालक पदांसाठी ही निवडणूक होत असून, सेवा सहकारी संस्था गटातून ११, ग्रामपंचायत गटातून ४, अडते व व्यापारी गटातून २ व हमाल तोलारी गटातून १ असे एकूण १८ संचालक निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी ३ ऑक्टोबर राेजी मतदान तर ४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.
...
सागवान ताेड, रिकव्हरी प्रकरण चर्चेत
या उत्पन्न बाजार समितीच्या भारसिंगी येथील यार्डातील अवैध सागवान ताेड प्रकरण, ऑडिट रिपाेर्टमध्ये काही संचालकांवर काढण्यात आलेली रिकव्हरी ही प्रकरणे सध्या चर्चेत आली आहेत. नरखेड संत्रा बाजार जगविख्यात आहे. पण, येथे शेतकऱ्यांच्या संत्र्यासाठी अद्यापही पक्के शेड उभारण्यात आले नाही. शेतकरी भवनातील सुविधांचा अभाव, अस्वच्छता, कार्यालय दुरुस्ती व रंगरंगोटी अभाव, यासह अन्य बाबींमुळे संचालकांमध्ये असंतोष निर्माण हाेऊन त्यांच्यात दुफळी निर्माण झाली. मध्यंतरी बबन लाेहे यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केल्याने ते अनिल देशमुखांपासून दुरावले आहेत.
...