लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने आठवडीबाजारांवर बंदी घालत टाळेबंदी तसेच जमाव व संचारबंदी लागू केली असली, तरी जलालखेडा (ता. नरखेड) येथे गुजरी बाजाराच्या नावाखाली राेज माेठा भाजीपाला बाजार भरत आहे. शिवाय, काेराेना संक्रमित व्यक्तींचाही मुक्तसंचार सुरू आहे. त्यामुळे गावात काेराेना संक्रमितांसाेबतच मृतांची संख्याही हळूहळू वाढत आहे. काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे उल्लंघन हाेत असताना प्रशासन काहीही कारवाई करायला तयार नाही.
जलालखेडा येथे दर शुक्रवारी भरणाऱ्या आठवडीबाजारावर बंदी घातल्यानंतर गावातील नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परिसरात राेज गुजरी बाजार भरायला सुरुवात झाली. या बाजारात भाजीपाल्यासाेबतच इतर वस्तूंचीही दुकाने थाटली जातात. या बाजारात दुकानदार दुकाने थाटताना तसेच ग्राहक खरेदी करताना दुकानांसमाेर फिजिकल डिस्टन्सिंगचे मुळीच पालन करीत नाहीत. या बाजारात खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांपैकी काेण काेराेना संक्रमित आहे आणि काेण नाही, हे कळायला मार्ग नसल्याने त्यांचा हा बेजबाबदारपणा काेराेना संक्रमणास कारणीभूत ठरत आहे.
या बाजारातील इतर वस्तूंच्या दुकानांकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. मध्यंतरी, पाेलीस प्रशासनाने भाजीपाला विक्रेत्यांसह इतर दुकानदारांना दुकाने न थाटण्याची तंबी देत गावात फिरून विक्री करण्याची सूचना केली हाेती. मात्र, पाेलिसांनी पाठ फिरवताच परिस्थिती ‘जैसे थे’च झाली. दरम्यान, शुक्रवारी भाजीपाला विक्रेत्यांनी आडवडीबाजारात माेठ्या प्रमाणात दुकाने थाटली हाेती. परंतु, ती लगेच उठवण्यात आली. शिवाय, संबंधित दुकानदारांना नाेटीसही बजावण्यात आल्या. हा प्रकार पुन्हा घडल्यास दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सुनील इचे यांनी दिली.
...
६० ॲक्टिव्ह, चाैघांचा मृत्यू
जलालखेडा येथे ६० नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे त्यांच्या रिपाेर्टवरून स्पष्ट झाले आहे. यातील चाैघांचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला आहे. मृतांमध्ये मनाेज गायकवाड या तरुण फुलविक्रेत्याचा समावेश आहे. गावातील वाढते काेराेना संक्रमण व मृतांची संख्या याबाबत सर्वांना माहिती आहे. मात्र, बहुतेक मंडळी काेराेना संक्रमण कमी करण्याच्या दृष्टीने प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करण्याकडे गांभीर्याने बघत नाही. हा गुजरी बाजार काेराेना संक्रमित रुग्णांच्या घरासमाेर भरत असल्याने याचा स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने विचार करून याेग्य उपाययाेजना करणे गरजेचे आहे, असे मत कुलदीप हिवरकर यांनी व्यक्त केले.