खापा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार खापा (ता. सावनेर) शहरात दाेन दिवस बंदचे आयाेजन करण्यात आले हाेते. या बंदला शहरात उत्तम प्रतिसाद मिळाला असून, शनिवार (दि. २७) व रविवारी (दि. २८) शहरातील अत्यावश्यक सेवा व साहित्याची दुकाने वगळता अन्य प्रतिष्ठाने दाेन्ही दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात आली हाेती.
यासंदर्भात खापा नगर परिषद प्रशासनाने तीन दिवसापासून ध्वनिक्षेपणाद्वारे नागरिकांसह दुकानदार व व्यापाऱ्यांना माहिती द्यायला सुरुवात केली हाेती. त्यामुळे शहरातील मेडिकल स्टाेर्स, काही किराणा दुकाने, पेट्राेलपंप, दूध व भाजीपाल्याची दुकाने, गॅस एजन्सी वगळता अन्य दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने दाेन्ही दिवस बंद ठेवण्यात आली हाेती. सामान्य नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडणे व इतरत्र फिरणे टाळले हाेते. त्यामुळे दाेन्ही दिवस शहरातील मुख्य मार्गासह विविध रस्त्यावर शुकशुकाट दिसत हाेता.
जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य बाबींवर ७ मार्चपर्यंत प्रतिबंध घातला आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क वापरणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य केले आहे. या उपाययाेजनांचे उल्लंघन केल्यास नागरिकांसह व्यापारी व दुकानदारांवर तसेच लग्नसमारंभात ५० पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी झाल्यास संबंधितांवर दंडात्मक तसेच प्रसंगी फाैजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डाॅ. ऋचा धाबर्डे यांनी दिली असून, नागरिकांनी उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.