लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : सण व उत्सवांमधून संस्कृती प्रतीत हाेते. त्यानिमित्त विकल्या जाणाऱ्या विशिष्ट वस्तूंमधून अनेकांच्या उपजीविकेला आर्थिक आधारही मिळताे. हाेळी आणि धुळवड हा यातील एक लाेकप्रिय सण असून, काेराेना संक्रमणामुळे या सणाची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित झाली आहे. दुसरीकडे, रामटेक शहरातील बाजारपेठेत कुणीही हाेळीनिमित्त विकल्या जाणाऱ्या साहित्यांची दुकाने न थाटल्याने तसेच ग्राहक ते साहित्य खरेदी करण्यास फारसे उत्सुक नसल्याने दिवसभर शुकशुकाट दिसून आला.
खरे तर हाेळी व धुळवडीच्या दिवशी शहरासह ग्रामीण भागात चैतन्याचे वातावरण असते. काेराेना संक्रमणामुळे चैतन्यमय वातावरण निराशेत बदलले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे याला प्रशासनासह प्रत्येकाचा नाईलाज आहे. दिवाळीनंतर काेराेना संक्रमण कमी व्हायला लागल्याने समाजजीवनासाेबत बाजारपेठाही सुरळीत व्हायला लागल्या हाेत्या. हे वातावरण अलीकडच्या काही दिवसांपर्यंत कायम हाेते. त्यामुळे अनेक दुकानदारांनी गाठ्यांसह रंगीबेरंगी वेगवेगळे मुखवटे, पिचकाऱ्या, रंग, गुलाल व धुळवडीचे वेगवेगळे साहित्य विकायला आणल्याने दुकाने साहित्याने सजली हाेती.
एरवी, हाेळीच्या दिवशी दुकानांसमाेर बच्चेकंपनींसाेबतच तरुणांची गर्दी असायची. मात्र, काेराेना संक्रमणामुळे नागरिकांनी स्वत: अथवा मुलांसह दुकानात येणे व या वस्तूंची खरेदी करणे टाळले. तरुणांमध्येही याबाबत फारसा उत्साह दिसून आला नाही. दुकाने उघडण्याच्या बदलेल्या वेळा आणि फिजिकल डिस्टन्सिंगमुळे या वस्तूंच्या विक्रीवर माेठा विपरीत परिणाम झाला आहे. मागील वर्षी ग्रामीण भागातील नागरिकांनी हाेळी व धुळवडीचा बऱ्यापैकी आनंद घेतला हाेता. यावर्षी मात्र ग्रामीण भागातच काेराेनाचे संक्रमण अधिक असल्याचे दिसून आल्याने याला ‘ब्रेक’ लागला आहे. धुळवडीनिमित्त शहरातील चाैकाचाैकात डीजे वाजविणे, रंग खेळणे यासह अन्य बाबींवर काेराेना संक्रमणामुळे बरीच नियंत्रणे आली आहेत.
...
फगवा, गरदेव भेट प्रथा
होळीच्या दिवशी घरोघरी जाऊन लाकडे, गोवऱ्या जमा करणे, सायंकाळी होळी पेटवणे, हाेळीची सामूहिक पूजा करणे हे ग्रामीण भागातील हाेळीचे वैशिष्ट्य आहे. यावर्षी याही वैशिष्ट्याला छेद गेला आहे. धुळवडीच्या दिवशी ढाेल, ताश, बॅण्ड, संदलच्या गजरात फगवा काढण्याची, रंग खेळल्यानंतर सायंकाळी महादेवाची यात्रा करून आलेले भक्त गरदेवाला भेटायला जाण्याची, पूजा करून गाठी अर्पण करण्याची परंपराही खंडित झाली आहे.