नागपूर : सणांच्या पार्श्वभूमीवर सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड दिसून येत आहे. गोकुळाष्टमीनंतर येणाऱ्या गणेशोत्सवासाठी लोक खरेदीसाठी घराबाहेर निघत आहेत. सीताबर्डी मेन रोड, इतवारी, मस्कासाथ मुख्य किराणा बाजार, गांधीबाग, भांडे बाजार, महाल मेन रोड, बडकस चौक येथील बाजारपेठांमध्ये तुडुंब गर्दी दिसून आली. विविध ऑफर्सचा फायदा घेत लोक खरेदी करीत आहेत. लोकांची खरेदी दिवाळीपर्यंत सुरू राहील, असे मत दुकानदारांनी व्यक्त केले.
इतवारी होलसेल किराणा व्यापारी संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवप्रताप सिंह म्हणाले, मध्यंतरी या बाजारात लोकांची कमी झालेली खरेदी आता पुन्हा वाढली आहे. आर्थिक बचतीसाठी लोक या बाजारात येतात. त्यामुळे येथील रस्ते पूर्वीप्रमाणेच गजबजले आहेत. या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी वाढली आहे. चारचाकी वाहन काढणे कठीण झाले आहे. लोकांमध्ये कोरोनाची भीती उरली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. दुकानदार नियमांचे पालन करीत असले तरीही बहुतांश नागरिक मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाहीत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत असल्याचे दिसून येते.
महाल येथील गारमेंट स्टोअरचे संचालक बळीराम शिवनानी म्हणाले, लोक उत्साहाने खरेदी करीत आहेत. लोकांना दुकानात टप्प्याटप्प्याने खरेदीसाठी सोडावे लागत आहे. एकीकडे कोरोना नियमांचे पालन तर दुसरीकडे व्यवसायावर परिणाम होत आहे. अनेक दिवसानंतर लोक खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. हे चांगल्या व्यवसायाचे लक्षण आहे. त्यामुळे नुकसान भरपाई होत आहे. दिवाळीपर्यंत अशीच गर्दी राहावी, अशी अपेक्षा आहे.
इलेक्ट्रॉनिक्स दुकानात ग्राहकांची गर्दी दिसत आहे. बहुतांश ग्राहक अत्याधुनिक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानात येत आहेत. याशिवाय विविध वित्तीय संस्थांच्या कर्ज पुरवठ्यावर लोकांची खरेदी वाढली आहे. सीताबर्डीच्या महाजन मार्केटमध्ये मोबाईल दुकानात लोकांची गर्दी दिसून आली. या दुकानात पाय ठेवायला जागा नव्हती. अनेक दिवसानंतर मार्केट खुले झाले आहे. लोक खरेदीसाठी येतात. त्यांना मनाई केली तर ग्राहक परत जातील, या भीतीने सर्वच ग्राहकांना खरेदीसाठी परवानगी देत असल्याचे संचालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
इतवारी सराफा बाजारात सर्व दुकानांमध्ये गर्दी होती. सोने आणि चांदीचे दर कमी झाल्याने गर्दी वाढल्याचे नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर यांनी सांगितले. अनेक दिवसानंतर लोक खरेदीसाठी येत आहेत. त्यामुळे सराफांमध्येही उत्साह संचारला आहे. तसेच गांधीबाग बाजारात गारमेंट आणि साड्यांच्या दुकानात ग्राहक मोठ्या प्रमाणात दिसून आले. लग्नसराई नसली तरीही लोक ऑफर्समध्ये गारमेंट खरेदी करीत आहेत.
गर्दीमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट
जिल्हा प्रशासन तसेच महानगरपालिकेने गर्दी होऊ नये अनलॉकमध्ये दुकानांची वेळ वाढवून दिली आहे. पण सध्या सणासुदीत नागपुरातील सर्वच बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. प्रत्येक बाजारात कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे.