लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : शहरातील मुख्य बाजार चाैकात राेडलगत असलेला फाेनचा खांब कित्येक वर्षांपासून निरुपयाेगी झाला आहे. हा परिसर वर्दळीचा असल्याने खांब रहदारीस अडसर व अपघातास कारणीभूत ठरत आहे. मात्र, हा खांब काढण्याची प्रशासन तसदी घेत नाही.
लँडलाइन फाेनचे कनेक्शन देण्यासाठी बीएसएनएलने कळमेश्वर शहरातील बाजार चाैकात काही खांब उभारले हाेते. यातील एक खांब कित्येक वर्षांपासून तिथेच आहे. शिवाय, या परिसरात कुणाकडेही लँडलाइन फाेनचे कनेक्शन नसल्याने या खांबावरून कुणाच्याही घरी, दुकान अथवा कार्यालयात केबल गेली नाही. स्थानिक नगरपालिका प्रशासनाने या परिसरातील राेडचे पाच वर्षांपूर्वी सिमेंटीकरण केले. मात्र, हा खांब काढण्यात आला नाही.
हा बिनकामाचा खांब सध्या अपघाताचे केंद्र ठरला आहे. हा परिसर गजबजलेला असून, वाहने चालविताना त्रास हाेताे. काही दिवसांपूर्वी कार या खांबावर धडकली. सुदैवाने यात कारचालकास दुखापत झाली नसली तरी कारचे माेठे नुकसान झाले. वारंवार हाेणारे अपघात टाळण्यासाठी हा खांब कायमचा हटवावा, अशी मागणी व्यापारी संघटनेचे सुरेश लंगडे, राजेश मुंधडा, नरेश गाठीबांधे, अविनाश माकोडे, रशीद शेख, मिनेश शेंडे, शंकर मानकर, राकेश केशरवानी, आनंद कळंबे, अमित मोहरे, प्रदीप कट्यारमल, राजू बोरकर, राकेश देशमुख यांच्यासह नागरिकांनी केली आहे.