कळमन्यात १० कोटींचा व्यवसाय ठप्प : सायंकाळी दिलासा नागपूर : राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधील विविध बाजाराच्या असोसिएशनने पुकारलेल्या बेमुदत बंदच्या आवाहानार्थ बुधवारी कळमन्यातील पाच बाजारपेठांमधील व्यवहार बंद होते. त्यामुळे एकाच दिवशी १० कोटींचा व्यवसाय ठप्प झाला. कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी शेतकरी आणि अडतियांसाठी एकसमान कायदा करण्याचे आश्वासन बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यानंतर कळमना बाजारातील अडतियांनी बेमुदत बंद बुधवारी मागे घेतला. एकसमान कायदा असावा नवीन अध्यादेशात बाजार समितीबाहेर माल विकणाऱ्यांकडून कोणताही कर आकारण्यात येणार नाही, तर समितीच्या आवारात विक्री करणाऱ्यांवर कराची तरतूद होती. एकाच व्यवसायासाठी दोन कायदे नको, अशी भूमिका अडतियांची होती. बाजार समितीच्या कायद्याचे दडपण नको बंद समितीचे प्रमुख मो. अफजल यांनी सांगितले की, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनेक कायदे अडतियांवर लादण्यात आले आहेत. बाजार समितीच्या कायद्याच्या दडपणामुळे व्यवसाय प्रभावित होत आहे. या जाचक कायदातून मुक्तता करण्याची अडतियांची मागणी आहे. याशिवाय अनेक मुद्यांवर मंत्र्यांशी चर्चा झाली. व्यवसायाला ‘बुस्ट’ मिळण्यासाठी नवीन कायदे अमलात आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतरच पदाधिकाऱ्यांनी बंद मागे घेण्याची घोषणा केली. बंदमध्ये कांदे-बटाटे, भाजीपाला, धान्य, मिरची, फळ आदी पाच बाजाराचे अडतियांचा समावेश होता. बाजार गुरुवारपासून सुरू होणार कळमन्यातील सर्व बाजारपेठांमधील व्यवहार गुरुवारपासून पूर्ववत होणार आहे. भाजीपाला बाजार पहाटेपासून सुरू होईल, तर अन्य बाजार सकाळी १० पासून सुरू होतील. सकाळी १० वाजता अडतियांची सभा होणार असून मंत्र्यांसोबत झालेल्या विस्तृत चर्चेची माहिती अडतियांना देण्यात येणार आहे. बुधवारी दुपारी कळमना मार्केट यार्डमधील अफजल ट्रेडिंग कंपनी येथे झालेल्या सभेत सर्व बाजाराचे पदाधिकारी उपस्थित होते.
बाजार गडबडला
By admin | Published: July 14, 2016 2:53 AM