नागपूर : प्रशासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी परिस्थिती फारशी समाधानकारक दिसली नाही. प्रशासनाने घालून दिलेल्या निर्देशानुसार बाजारपेठा बंद असल्या तरी शहरातील अनेक भागांत रस्त्यावर वर्दळ कायम होती. धंतोली, रामदासपेठ परिसरात तर रोजच्या सारखीच मार्गाच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या वाहनांची गर्दी होती. काम असणाऱ्यांसोबत अनेक रिकामटेकडेही शहरात फिरताना दिसत होते. शहरातील अनेक भागांत हेच चित्र होते.
कोरोना संक्रमणावर नियंत्रणासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या कडक लॉकडाऊनचा परिणाम सकाळपासूनच शहरात दिसेल, असे वाटत असताना ही आशा मात्र फोल ठरली. सकाळी ९ वाजेपर्यंत शहरातील अनेक रस्ते नेहमीसारखेच वर्दळीचे दिसले. अनेक चौकांत सकाळी ९ वाजल्यानंतरच पोलीस बंदोबस्त दिसला. मात्र वाहनधारकांना हटकताना पोलीस क्वचितच दिसले. डबलसीट वाहनचालकांवर मात्र पोलिसांनी अनेक चौकांत कारवाई केली. वाडी, हिंगणा या मार्गाने शहरात येणाऱ्या वाहनांची चौकशी पोलीस करताना दिसले.
छत्रपती चौक, ऑरेंज सीटी चौक, माटे चौक आदी भागात सकाळनंतर पोलिसांचा बंदोबस्त होता. दुपारी ही कारवाई थंडावलेली दिसली. सायंकाळनंतर शासकीय कार्यालयांना सुटी झाल्यावर शहरातील मार्गावरील वर्दळीत पुन्हा भर पडली.
...
ऑटो, बस सेवा सुरू
शहरातील ऑटोरिक्षा आणि शहर बस वाहतूक सेवा सुरू होती. मात्र म्हणावे तसे प्रवासी नव्हते. एसटी महामंडळ आणि खासगी प्रवासी वाहतूकदारांनी बसची संख्या कमी केली आहे. असे असूनही लॉकडाऊनमुळे बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची बसमध्ये गर्दी नव्हती. त्यामुळे अनेक स्टाॅपवरील ऑटोरिक्षांची सेवाही प्रभावित झाली. बहुतेक नागरिक शहरात दुचाकीने प्रवास करताना मोठ्या प्रमाणावर दिसले.
...
पेट्रोलपंपांचा व्यवसाय २० टक्क्यांवर
शहरातील पेट्रोलपंपांचा व्यवसायही लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी खालावलेला दिसला. हिंगणा मार्गावरील एका पेट्रोलपंप चालकाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजेपर्यंत रोजच्या तुलनेत फक्त १० टक्के व्यवसाय झाला. सायंकाळपर्यंत सरासरी २० टक्केच व्यवसाय झाला. अनेकांनी आदल्या दिवशीच पेट्रोलची तजवीज केल्याने रविवारी सायंकाळी अनेक पंपांवर गर्दी होती.
...