लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केला आहे. परंतु यापूर्वीपासून शनिवार व रविवारी शहरात बंद पुकारला जात आहे. या आठवड्यातही तो लागू राहील. त्यामुळे लॉकडाऊन हा सोमवारपासून असला तरी उद्या शनिवारपासूनच त्याचा परिणाम दिसून येईल. त्यामुळे शुक्रवारी नागरिकांनी शहरातील सर्वच बाजारपेठेत गर्दी केली. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कुठलीही उपाययोजना दिसून आली नाही. ही गर्दी पाहता कोरोना नियंत्रणात येणार का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागपुरात आधीच १४ मार्चपर्यंत अंशत: प्रतिबंध लागू होते. तसेच प्रत्येक शनिवार, रविवारी बंद पुकारला जात होता. या शनिवारी व रविवारीसुद्धा तो लागू आहे. त्यामुळे येत्या १५ मार्चपासून लॉकडाऊन सुरु होत असला तरी उद्या १३ पासूनच बंदला सुरुवात होईल. त्यामुळे नागरिकांनी आजच बाजाराच गर्दी केली. सीताबर्डी, महाल, इतवारी, मस्कासाथ, गोकुळपेठ, खामला, जरीपटका, सदर या भागात तर इतकी गर्दी होती की वाहतूक जाम झाली होती.
कुलर, सलून व हार्डवेअरच्या दुकानात सर्वाधिक गर्दी
शुक्रवारी बाजारात सर्वत्रच गर्दी होती. परंतु कूलर, सलून व हार्डवेअरच्या दुकानात सर्वाधिक गर्दी दिसून आली. उन्हाळा सुरू झाला आहे. कडक ऊन पडू लागले आहे. अशाच २१ तारखेपर्यंत लॉकडाऊन असल्याने कूलर, दुरुस्ती,नवीन कुलर खरेदी करणे, त्याला ताट्या लावणे आदींसाठी गर्दी केली. तसेच सलून व हार्डवेअरच्या दुकानातही गर्दी होती.
दारू दुकानावरील गर्दी अनियंत्रित
लॉकडाऊनची घोषणा होताच सर्वात प्रथम दारूच्या दुकानांसमोर गर्दी वाढली. २१ मार्चपर्यंत दारूची दुकाने बंद राहणार आहेत. तसेच शनिवार व रविवारीही दारूची दुकाने बंद राहतील. त्यामुळे शुक्रवारी दारूच्या दकानावर अनियंत्रित गर्दी झाली. शहरातील बहुतांश भागातील दारू दुकानासमोर गर्दी होती. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांनी कडक भूमिकाही घ्यावी लागली.