लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेश चतुर्थीनिमित्त घरोघरी गणेशाच्या आगमनाची जोरात तयारी सुरू आहे. २२ ऑगस्टला गणपती बाप्पा मोरयाची धूम राहणार आहे. यानिमित्त गणरायाच्या रंगीबिरंगी आणि आकर्षक मूर्तींमुळे चितारओळ आणि विविध ठिकाणी भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एक ते चार फुटांपर्यंत मूर्तींची उंची आहे. पूजेच्या सामग्री खरेदीसाठी भक्तांची बाजारात गर्दी वाढली असून गणेशोत्सवानिमित्त सर्वच बाजारपेठा फुलल्या आहेत.घरोघरी स्थापना होणाऱ्या लहान गणेश मूर्तींना मागणी वाढली आहे. सर्वाधिक विक्री एक ते दोन फूट गणेश मूर्तीची होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळाला यावर्षी परवानगी न मिळाल्याने चार फूट मूर्ती आधीच ऑर्डर देऊन तयार केल्या आहेत. यावर्षी मूर्तिकारांनीही चार फूट ऐवजी लहान मूर्ती तयार करण्याला प्राधान्य दिले आहे. मूर्तींचा शृंगार आणि सजावट रंगीबिरंगी कपडे व दागिन्यांनी केली आहे. गणरायाच्या स्थापनेसाठी लायटिंगने सजावट केलेल्या सिंहासनाला मागणी वाढली आहे. मंदिर आणि सिंहासन एक हजार रुपयांपासून असून फिनिशिंग आणि कलाकारी अनोखी आहे. सजावटीसाठी आकर्षक मखमली आसन आणि रंगीत व चमकीच्या कपड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे.कापूर, धूप आणि अगरबत्तीची खरेदीगणेशोत्सवानिमित्त बाजारात पूजेच्या सामग्रीची मागणी वाढली आहे. भक्त कापूर, विविध प्रकारच्या सुगंधित अगरबत्ती, धूप आणि नारळ, पान, सुपारीसह विविध वस्तूंची खरेदी करीत आहेत.मूर्ती खरेदीसाठी आलेले भक्त सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाहीत. मूर्तिकारांनी मार्केटमध्ये वाढती गर्दी पाहता प्रशासनाने नियंत्रण आणून कोरोनापासून बचाव करण्याची मागणी केली आहे. कोरोना संसर्ग वाढत आहे. ही बाब लोक गांभीर्याने घेत नसून बाजारात गर्दी करीत आहेत. यामुळे दुकानदारांनाही धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून गर्दी कमी करावी, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.