नागपूर : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील शेतकऱ्यांनी केलेल्या भारत बंदमध्ये नागपुरातील सर्वच बाजारपेठा सुरू होत्या. व्यापाऱ्यांनी बंदला समर्थन न देता सकाळपासूनच दुकाने सुरू करून नियमित व्यवहार सुरू ठेवले. आंदोलनकर्त्यांच्या धास्तीने काही बाजारपेठ सकाळी बंद होत्या, पण आंदोलनकर्ते गेल्यानंतर पुन्हा बाजारपेठा सुरू झाल्या. अन्य बाजारपेठांमध्ये देशव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
भारत बंदमध्ये इतवारी व मस्कासाथ किराणा, इतवारी सराफा ओळ, जुना भंडारा रोड, गांधीबाग, महाल, सीताबर्डी, सक्करदरा या बाजारपेठा सकाळी काही वेळासाठी बंद होऊन पुन्हा सुरू झाल्या. या बाजारपेठांमध्ये नियमित व्यवहार झालेत. व्यापारी म्हणाले, कृषी कायद्याचा विषय आमचा नाही. त्यामुळे पाठिंबा दिला नाही. लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये आधीच व्यवसाय बुडाला आहे. व्यवहार बंद ठेवल्याने व्यवसायावर परिणाम होणार होता. त्यामुळे असोसिएशनने निर्णय घेऊन व्यवसाय बंद न ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, शेतकऱ्यांच्या भारत बंदला आमचा पाठिंबा होता, पण बाजारपेठा बंद ठेवण्यास नकार होता.
इतवारी किराणा असोसिएशनचे सचिव शिवप्रताप सिंह म्हणाले, नेहमीप्रमाणे किराणा व्यवसाय सुरू होता. आवश्यक वस्तूंच्या बाजारपेठा बंद न ठेवण्याचा निर्णय घेतल्याने या बाजाराचे व्यवहार नियमित सुरू होते. यानुसार इतवारी, मस्कासाथ, किराणा ओळ येथील दुकाने सुरू होती.
नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर म्हणाले, भारत बंदमध्ये सराफा व्यावसायिकांचा सहभाग नव्हता. नागपुरातील जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त दुकाने सुरू होती.
कळमना बाजारात ५ कोटींचा व्यवसाय ठप्प
कृषी कायद्याच्या निषेधार्थ भारत बंदमध्ये कळमना धान्य बाजारातील आडतिया आणि व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रतिष्ठान बंद ठेवले आणि बंदला पाठिंबा दिला. पण कळमन्यातील भाजीपाला, फळ बाजार, ग्रेन मर्चंट असोसिएशन, आलू-कांदे बाजारातील व्यवहार सुरू होते.
धान्य मंडळाचे अध्यक्ष अतुल सेनाड यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढून निषेध करण्यात आला. निषेध सभा बोलावून शेतकऱ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने आंदोलन करण्यात आले आणि केंद्र सरकारविरोधात नारेबाजी करण्यात आली. संपूर्ण मार्केटमध्ये मिरवणूक काढून विरोध दर्शविण्यात आला. आंदोलनात मंडळाचे पदाधिकारी गोपाळराव कळमकर, रामेश्वर हिरुळकर, सारंग वानखेडे, नरेश जिभकाटे, नीळकंठ हटवार, राजू उमाठे, रहमान शेख, राजेश सातपुते, स्वप्निल वैरागडे, भूषण क्षीरसागर, पंढरीनाथ मुंडले, चिंटू पुरोहित, रामदास गजापुरे, रमेश नाकाडे, उदय आकरे, विनोद कातुरे, भीमराव मुटे, मनोज भालोटिया, कमलाकर घाटोळे, मनोहर हजारे, सुरेश बारई, इस्माईल शेख, ज्ञानेश्वर गजभिये, गंगाधर बोरकर, दिनेश चांडक, शंकर शेंडे, सुनील गवते, राजू ठवकर उपस्थित होते.