नागपूर : प्रसिद्ध गायिका अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या स्वरांमध्ये संत सेवालाल महाराज यांच्या चरित्रावर आधारित ‘मारो देव बापू सेवालाल’ हे गाणे मुद्रीत करण्यात आले असून, या गीताचे चित्रीकरण वाशिम येथील पोहरादेवी येथील श्री क्षेत्र पोहरागड मंदिरात होणार आहे.
१५ फेब्रुवारीला संत सेवालाल महाराज यांची जयंती असून, त्या पार्श्वभूमीवर रविवारी १२ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र पोहरागड येथे संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व ‘सेवाध्वज’ समापन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात हे गीत निनादणार असून, यावेळी बंजारा वेशातील अमृता फडणवीस यांची उपस्थिती आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
या गीताची संकल्पना बंजारा वर्ल्ड चॅनलचे संचालक योगेश जाधव यांची असून, गीतरचना नीलेश जळमकर यांची आहे. हे गीत कामोद सुभाष यांनी संगीतबद्ध केले आहे. अनिता राठोड यांनी अमृता फडणवीस यांचे बंजारा पोषाख डिझाइन केले असून, बंजारा भक्तीगीत श्रेणीतील या गीताचे भव्य व भक्तीमय चित्रीकरण लवकरच होणार आहे. निर्मिती योगेश जाधव, अनिता राठोड व संदीप जोशी यांची आहे. या गीताद्वारे बंजारा समाजाचे आराध्य दैवत व विश्वाला शांतीचा संदेश देणारे महान संत सेवालाल महाराज यांची महत्ता कळल्याची भावना अमृता फडणवीस यांनी गाणे संगीतबद्ध करताना व्यक्त केली आहे.
..................