लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर येथील सुनील अग्रवाल व अर्चना अग्रवाल यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस ब्रह्मपुरी तालुक्यातील पाच अत्यंत गरीब जोडप्यांचा विवाह साजरा करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. हा विवाह सोहळा अतिशय थाटामाटात नागपूरच्या हिवरी ले-आऊटमधील माहेश्वरी भवनात मंगळवारी पार पडला.स्वत:चा वाढदिवस असो वा लग्नाचा तो धुमधडाक्यात साजरा करण्याची प्रथा सुरु आहे. यासाठी हजारो रुपयेसुद्धा खर्च केले जातात. नागपूर येथील सुनील अग्रवाल व अर्चना अग्रवाल या दाम्पत्याने आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवस गरीब पाच जोडप्यांचा विवाह लावून साजरा करण्याचा ठरविले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याची निवड करुन पाच गरीब जोडप्यांची निवड करण्याची जबाबदारी किरण वडेट्टीवार, ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्ष रिता उराडे, संध्या जैन यांच्यावर सोपविण्यात आली. ती त्यांनी पार पाडली. या पाचही जोडप्यांचा विवाह सुनील अग्रवाल व अर्चना अग्रवाल या दाम्पत्याने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला म्हणजेच मंगळवारी लावून दिला. त्यांनी मुलीचे कन्यादान करुन पाचही जोडप्यांना संसारपयोगी सर्व वस्तूंसह सायकल, पंखे, शिलाई मशिन, कपाट भेट दिले. या विवाह सोहळ्याला आमदार विजय वडेट्टीवार व किरण वडेट्टीवार यांच्यासह ब्रह्मपुरी नगराध्यक्ष रिता उराडे, नगरसेविका, वनिता अलगदेवे सुनीता तिडके व लता ठाकूर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. लग्नाचा वाढदिवस गरीब कुटुंबातील लोकांचे लग्न लावून साजरा करण्याचा हा पहिलाच उपक्रम असल्याने हा सोहळा चर्चेचा विषय ठरला होता.
पाच गरीब जोडप्यांचा विवाह करून साजरा केला लग्नाचा वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:58 AM
नागपूर येथील सुनील अग्रवाल व अर्चना अग्रवाल यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस ब्रह्मपुरी तालुक्यातील पाच अत्यंत गरीब जोडप्यांचा विवाह साजरा करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.
ठळक मुद्देअग्रवाल दाम्पत्याने समाजापुढे ठेवला नवा आदर्श