लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माहेरून हुंड्याची रक्कम आणावी म्हणून नवरा आणि सासरच्या मंडळींनी एका विवाहितेचा प्रचंड छळ केला. या छळाला कंटाळून पीडित महिलेने आत्महत्या केली. पूजा सुधीर विश्वकर्मा (वय २८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगरात राहत होती.पूजाचा नवरा आरोपी सुधीर एका चॉकलेट कंपनीत काम करायचा. त्या आधारे नोकरी आहे, असे सांगून छिंदवाडा येथील पूजा सोबत त्याचे अडीच वर्षांपूर्वी लग्न झाले. पूजाच्या माहेरची स्थिती बेताची होती. ती मामाकडे वाढली. त्यांनीच तिचे लग्न लावून दिले. लग्नाच्या वेळी आरोपी सुधीर आणि त्याच्या परिवाराला तीन लाख रुपये हुंडा आणि चिजवस्तू देण्यात आल्या होत्या. लग्नाच्या काही दिवसांनंतर आरोपी सुधीरने कामावर जाणे सोडले. तो ऐतखाऊ बनला. आपल्या गरजा भागविण्यासाठी तो पूजाला तिच्या माहेरून पैसे आणण्यास सांगत होता. माहेरची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे पूजा त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न करीत होती. मात्र, सुधीर तिची अवस्था समजून घेण्याऐवजी तिला माहेरून पैसे आणावे म्हणून मारहाण करायचा. टोचून बोलायचा. त्याचे वडील जगदीश विश्वकर्मा आणि लहान भाऊ देवेंद्र विश्वकर्मा हे देखील पूजाचा छळ करीत होते. त्यांच्याकडून होणारा त्रास असह्य झाल्याने पूजाने आपल्या माहेरच्यांना सांगितले. त्यामुळे माहेरच्यांनीही आरोपी सुधीर तसेच त्याच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, पूजाचा छळ कमी झाला नाही. त्यामुळे ते पूजाला घेऊन छिंदवाड्याला गेले. तेथे पूजाने पोलिसांकडे छळाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी सुधीर आणि त्याच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले. त्यावेळी पूजासोबत चांगले वर्तन करण्याची हमी देऊन आरोपींनी पूजाला नागपुरात आणले. मात्र, येथे आणल्यानंतर त्यांनी तिचा परत हुंड्यासाठी छळ सुरू केला. तो असह्य झाल्याने अखेर ३ ऑगस्टला पहाटेच्या वेळी पूजाने तिच्या घरात ओढणीने गळफास लावून घेतला.तिच्या मृत्यूला आरोपी नवरा सुधीर, त्याचे वडील जगदीश आणि भाऊ देवेंद्र हे कारणीभूत असल्याची तक्रार पूजाचे नातेवाईक राजेश वारेलाल विश्वकर्मा (वय ४९, रा. चांद रोड, छिंदवाडा) यांनी नोंदवली. त्यावरून एमआयडीसीचे ठाणेदार भारत क्षीरसागर यांनी बुधवारी आरोपींविरुद्ध कलम ३०४ (ब), तसेच हुंडाबळी प्रतिबंध कायद्याचे सहकलम ३, ४ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे. हतबल पूजाच्या भावना डायरीत काही दिवसांपूर्वीच नवऱ्याने चांगल्या वर्तणुकीची हमी दिल्यामुळे आपण माहेरून त्याच्यासोबत पुन्हा सासरी आलो. आता पुन्हा तो आणि त्याचे नातेवाईक छळ करीत असल्यामुळे माहेरच्यांना कसे सांगावे, असा पूजाला प्रश्न पडला होता. माहेरच्या मंडळींना पुन्हा छळ सांगितल्यास ते काळजीत पडतील असेही तिला वाटत होते. दुसरीकडे नवरा- सासऱ्याकडून होणारा छळ सहन होत नव्हता. त्यामुळे पूजा आपल्या भावना एका डायरीत लिहून ठेवायची. ही डायरी पूजाच्या सामानात पोलिसांना सापडली. त्यावरून ती किती हतबल होती, हे स्पष्ट झाले आहे.
नागपुरात हुंड्यासाठी घेतला विवाहितेचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 9:36 PM
माहेरून हुंड्याची रक्कम आणावी म्हणून नवरा आणि सासरच्या मंडळींनी एका विवाहितेचा प्रचंड छळ केला. या छळाला कंटाळून पीडित महिलेने आत्महत्या केली.
ठळक मुद्देएमआयडीसीतील घटना : नवरा, सासरा आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल