पोलिसांकडून आरोपींना अभय : पीडित महिलेची कोंडी नागपूर : जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा सलग छळ होत असताना पोलीस मात्र तिला मदत करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. परिणामी कोंडी झालेली पीडित महिला जीव मुठीत घेऊन जगत असल्याची संतापजनक माहिती पुढे आली आहे. पल्लवी रंजन चापके (वय २५) असे पीडित महिलेचे नाव आहे. ती मूळची मूर्तिजापूर येथील रहिवासी आहे. एक वर्षांपूर्वी तिचे रंजन चापके (रा. विठ्ठलवाडी, हुडकेश्वर) सोबत लग्न झाले होते. पल्लवीच्या तक्रारीनुसार, रंजन तिचा दोन तीन महिन्यानंतरच शारीरिक आणि मानसिक छळ करू लागला. त्यामुळे पल्लवी कौटुंबिक सुखापासून वंचित झाली. अश्लील भाषेत शिवीगाळ, टोचून बोलणे या प्रकारामुळे घरात वाद वाढले. असाच एक दिवस वाद सुरू झाला आणि तो टोकाला पोहचला. आरोपींनी तिला त्या दिवशी जबरस्तीने फिनाईल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिनाईलच्या रसायनामुळे पल्लवीच्या शरीराचा बराचसा भाग होरपळला. तिने आपल्या मोबाईलवरून १०० क्रमांकावर नियंत्रण कक्षात फोन केला. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तिला मेडिकलमध्ये दाखल केले.या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी जीवे मारण्याच्या प्रयत्नांसह विविध आरोपाखाली त्यावेळी गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात प्रारंभीपासूनच संशयास्पद भूमिका वठविली. आरोपींना पाठीशी घालण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, या प्रकारानंतर पल्लवीचा तिच्या सासरच्या मंडळीसोबतचा वाद टोकाला पोहचला. तेव्हापासून (आई-वडिलांकडे कौटुंबिक अडचणी असल्याने) पल्लवी आपल्या ८६ वर्षीय आजीच्या सोबतीने एकटीच तिच्या सासरच्या घरात राहत आहे. आरोपींना मदत करण्याची पोलीस भूमिका वठवित असल्यामुळे पल्लवीला नियमित शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. कोर्टात सेटलमेंट केले नाही तर जाळून टाकू अशी धमकी तिला आरोपींच्या नातेवाईकांनी काही दिवसांपूर्वी दिली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही पोलीस अदखलपात्र अशी नोंद करीत तिला वाटेला लावत आहे. (प्रतिनिधी) जीवाला धोका या एकूणच छळामुळे पल्लवीची प्रचंड कोंडी झाली आहे. जगण्याचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने जीव मुठीत घेऊन पल्लवी कसेबसे दिवस काढत आहे. पोलिसांकडून मदत मिळत नसल्यामुळे आपल्या जीवाला कधीही धोका होऊ शकतो, असे तिने एका तक्रारवजा निवेदनातून म्हटले आहे.
सासरच्यांकडून विवाहितेचा छळ
By admin | Published: August 01, 2016 2:23 AM