नागपूर : हुंड्यासाठी हपापलेल्यांनी एका विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केले. नरेंद्रनगरात ही घटना घडली. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी मंगेश पुरुषोत्तम रेवतकर (वय ३७) आणि त्याच्या एका महिला नातेवाईकांवर हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
रुचिता मंगेश रेवतकर (वय ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ती नरेंद्रनगरातील सिद्धिविनायक मंदिराजवळ राहत होती. रुचिताचा पती मंगेश रेवतकर गेल्या चार वर्षांपासून तिचा छळ करीत होता. माहेरून रुचिताने पैसे आणावे म्हणून तिला सारखा मारहाण करायचा. मंगेशची एक महिला नातेवाईकही त्याला साथ देत होती. ते दोघे रुचिताला जीवे मारण्याचीही धमकी द्यायचे. या त्रासाला कंटाळून रुचिताने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला नवरा आणि त्याची एक महिला नातेवाईक कारणीभूत असल्याचा आरोप रुचिताच्या नातेवाईक अलका सुरेशराव कवडे (वय ५३, रा. पांढूर्णा) यांनी बेलतरोडी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीतून नोंदवला. त्यावरून मंगळवारी पोलिसांनी आरोपी रेवतकरविरुद्ध हुंडाबळी प्रतिबंधक कायद्याचे कलम ३, ४ तसेच भादंविच्या ३०४ (ब), ३०६, ४९८, ३२३, ५०६ (ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
-----
चावी बनवायला आला, तीन लाख घेऊन गेला
नागपूर : चावी बनवून देण्यासाठी आलेल्या आरोपीने कपाटातील ३ लाखांची रोकड चोरून नेली. सोमवारी दुपारी १२.३० ते २.३० च्या सुमारास ही घटना घडली. किसन फकिरचंद माटिया (वय ६५, रा. स्वामी कॉलनी आकारनगर, गिट्टीखदान) यांनी आरोपी हरजिंदरसिंग आणि त्याचा भाऊ (रा. कामठी) यांना आलमारीच्या लॉकची चावी बनविण्यासाठी घरी बोलावले होते. या दोघांनी रविवारी आणि सोमवारी कामाच्या निमित्ताने घरी येऊन बनावट चावीने कपाटाच्या लॉकरमधील ३ लाखांची रोकड चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर माटिया यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
----