लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुसऱ्या महिलेशी असलेले संबंध माहीत पडल्याने पतीला विरोध करणाऱ्या महिलेला आरोपी पतीने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. शशिकिरण पंकजकुमार सिंग (वय २६) असे मृत महिलेचे नाव असून, कोतवाली पोलिसांनी हा घटनाक्रम उघड झाल्यानंतर आरोपी पतीला अटक केली.शशिकिरण आणि आरोपी पंकजकुमार सिंग या दोघांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना चार वर्षांची एक मुलगीही असल्याचे समजते. ते महालमधील झेंडा चौकाजवळ राहत होते. काही दिवसांपासून आरोपी पंकजकुमारचे एका दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध जुळले. त्याची माहिती कळाल्याने शशिकिरण आरोपी पतीसोबत वाद घालू लागली. हा वाद टोकाला पोहचला. त्यामुळे आरोपी तिला नेहमी मारहाण करून तिचा छळ करू लागला. तिला आत्महत्येस प्रवृत्त करू लागला. त्याला कंटाळून बुधवारी सकाळी शशिकिरणने गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या सूचनेवरून प्रारंभी कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान, शशिकिरणचा भाऊ शैलेशकुमार जगदीशप्रसाद सिंग (वय ३०, रा. इब्राहिमपूर, (जि. छपरा) बिहार, ह.मु. कोल्हापूर) हा नागपुरात पोहचला. त्याने बहिणीच्या आत्महत्येला आरोपी पंकजकुमार हाच कारणीभूत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्या छळाची आणि अनैतिक संबंधाचीही तक्रार केली. पंकजकुमारकडून होणारा शारीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्यामुळेच शशिकिरणने आत्महत्या केल्याचे शैलेशकुमार याने कोतवाली पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नोंदवले. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पंकजकुमार सिंग याला अटक केली.