नागपूर : गोवारी हे आदिवासीच असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. १९९४ पासून सुरू असलेल्या संघर्षातून, बलिदानातून न्याय पदरात पडला. मात्र लोकशाही आघाडी सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करून गोवारींच्या तोंडचा घास हिरावला. लोकशाही आघाडी सरकारने आमचा घात केल्याची भावना व्यक्त करीत गोवारी बांधवांनी शहीद गोवारींना श्रद्धांजली अर्पण केली.
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी समाजाने हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता. या मोर्चात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. तत्कालीन सरकारने शहीद गोवारी स्मारकाची निर्मिती झिरोमाईल चौकात केली. तेव्हापासून विदर्भासह, राज्यातून गोवारी बांधव दरवर्षी २३ नोव्हेंबर रोजी स्मारकावर येतात. बुधवारी सकाळपासूनच मोठ्या संख्येने गोवारी बांधव स्मारकावर पोहचले होते. स्मारकावरील शहिदांच्या कोरलेल्या नावांवर पुष्प अर्पण करून स्तंभापुढे नतमस्तक झालेल्या अनेकांना अश्रू अनावर झाले होते. २८ वर्षांपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत बळी पडलेल्या आपल्या आप्तेष्टांच्या नावासमोर उभे राहून आई, वडील, पत्नी, मुलगा पुष्प अर्पण करताना त्यांचे डोळे पाणावले होते. न्यायासाठी संघर्ष हा अटळ राहील अशी भावना व्यक्त करीत आपल्या परतीचा मार्ग धरला.