लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठीतील ज्येष्ठ समीक्षक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांच्या ‘अठराशे सत्तावन आणि मराठी कादंबरी’ या समीक्षा ग्रंथाला मराठवाडा साहित्य परिषदेने ‘प्राचार्य म.भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कार’ जाहीर केला आहे.
मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादचे २०२१ चे ग्रंथ पुरस्कार परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी जाहीर केले. यात डॉ. प्रमोद मुनघाटे यांच्यासह बीड येथील ॲड. विजय जावळे यांच्या ‘लोकमात’ या कादंबरीला ‘नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार’, पुणे येथील देवा झिंजाड यांच्या ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या कवितासंग्रहाला ‘कै. कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार’, सोलापूर येथील लोणवीरेचे संतोष जगताप यांच्या ‘विजेने चोरलेले दिवस’ या कादंबरीला ‘बी. रघुनाथ कथा-कादंबरी पुरस्कार’, औरंगाबादचे डॉ. अनंत कडेठाणकर यांच्या ‘साल्मन’ या नाटकाला ‘कुमार देशमुख नाट्य पुरस्कार’ आणि मुंबईच्या ग्रंथाली वाचक चळवळ या संस्थेला ‘रा.ज. देशमुख स्मृतिपुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे व कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, कार्यक्रम समितीचे डॉ. रामचंद्र काळुंखे व डॉ. कैलास इंगळे उपस्थित होते.
...............