सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असताना दुसरीकडे याचा फायदा घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आता तर नागपुरातच एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने घराघरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक जण प्रतिबंधक उपाय करण्याच्या प्रयत्नात आहे. परिणामी, औषध विक्रेत्यांकडे ‘एन-९५’ मास्कसोबतच सर्जिकल व साध्या मास्कची मागणी वाढली आहे. यामुळे गेल्या महिन्यात १० रुपयात विकलेले साधे मास्क आता १५ रुपयांत मिळत आहे, तर ‘एन-९५ मास्क’ ज्याची किमत ‘एमआरपी’नुसार १५० आहे ते जीएसटी मिळून २१० रुपयांना विकले जात आहेत.विशेष म्हणजे, नुकतेच ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’ करून मास्कच्या काळाबाजाराचे वास्तव उघडकीस आणले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याची दखल घेऊन काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले. परंतु त्यानंतरही ‘औषध प्रशासन’ (एफडीए) व वैधमापन शास्त्र विभागाला हे थांबविण्यास अद्याप यश आले नसल्याचे वास्तव आहे.‘एन-९५’ मास्कचा वापर केवळ रुग्ण, जवळचे नातेवाईक, उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका व सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. परंतु सामान्यांपासून ते एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणाऱ्यांकडून या मास्कची मागणी वाढली आहे. शहरात या मास्कचा तुटवडा पडला आहे. यामुळे अनेक जण गांधीबाग येथील दवाबाजारात गर्दी करीत आहेत. याच बाजारातील एका ‘सर्जिकल स्टोअर्स’ने ‘बॅच क्र. १७०८जी१७७एनई’ एन-९५ मास्क ज्याची किमत एमआरपीनुसार १५० असताना त्याला २०० रुपये, व ‘जीएसटी’ १० रुपये असे एकूण २१० रुपये किमतीत विकत आहे. एका ग्राहकाला पाच मास्क १०५० रुपयात विकले. याची पावतीही दिली आहे. यावरून मास्कचा काळाबाजार करणारे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही जुमानत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
शुक्रवारपासून कारवाईजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ‘एफडीए’ व ‘वैधमापन शास्त्र’ विभागाची गुरुवारी बैठक घेतली. त्यांनी मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार शुक्रवारपासून ही कारवाई करण्यात येईल.-धनवंत कोवे, उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र विभाग