भिवापूर : ‘अनलॉक’ची प्रक्रिया राबविताना शासनाने मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगची नियमावली यापुढेही प्रत्येकाला पाळावीच लागेल, अशा सूचना केली. काही दिवस त्याचे पालनही झाले. आता मात्र ट्रॅव्हल्स व एसटीचा प्रवास करताना प्रवाशांच्या तोंडावरील मास्क गायब आणि फिजिकल डिस्टन्सिंग कुठाय? या प्रश्नाचे उत्तरच मिळत नाही. एका सीटवर कुठे दोन, तर कुठे तीन प्रवासी बसल्याचे चित्र आहे. खंडित झालेली कोरोना संसर्गाची साखळी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा जुळत आहे. महानगरात दररोज पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात कोरोना नियंत्रणात असला तरी वेळीच सुरक्षिततेचे नियम न पाळल्यास तालुक्यात संसर्गजन्य परिस्थीत निर्माण होऊ शकते. मात्र खासगी प्रवासी ट्रॅव्हल्ससह महामंडळाच्या एसटी बसमध्ये प्रवास करताना संसर्गाला रोखणारी नियमावली अक्षरश: पायदळी तुडविल्या जात आहे. ५० ते ५५ प्रवासी क्षमता असलेल्या ट्रॅव्हल्समध्ये चक्क ७०वर प्रवासी आढळत आहे. त्यातही एखादाच प्रवासी मास्क घातलेला असतो. एका सीटवर दोन, तर कुठे तीन प्रवासी बसत असल्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे. सॅनिटायझर तर शोधूनही सापडत नाही. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्समधून कोरोना संसर्गाची वाहतूक होत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
नियम कोण पाळणार?
प्रथमत: प्रत्येकाने स्वत:सह इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र प्रवासी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. महत्त्वाचे म्हणजे सुरक्षेची तेवढीच जबाबदारी ट्रॅव्हल्समालक व चालकाची आहे. नफा कमविण्याच्या प्रयत्नात सुरक्षेची नियमावली त्यांच्याकडूनही पायदळी तुडविल्या जात आहे. त्यामुळे अशा प्रवासी वाहनांवर तत्काळ कारवाई करणे आवश्यक आहे.