लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रादुर्भावावर प्रतिबंधक म्हणून मास्क महत्त्वाचा घटक आहे. या मास्कची किंमत निश्चित करुन योग्य त्या किमतीत नागरिकांना मिळावा यासाठी शासनाने राज्यात एन-९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तीनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. शिवाय, उपलब्ध मास्कचा फलक किमतीनुसार औषध दुकानांचा बाहेर लावण्याचे निर्देशही दिले. परंतु लोकमत चमूने याबाबतचा ‘रिॲलिटी चेक’ केला असता ‘एन ९५’ मास्क कुठे १०० तर कुठे १५० रुपयांत मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. किमतीचे फलकही कुठेच आढळून आले नाहीत.
मास्कच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेला पडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे शासनाने मास्कचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली. समितीने उत्पादित मालाच्या उत्पादनाचा खर्च व त्याची योग्य किंमत ही ‘कॉस्ट ऑडिटर’ यांच्या साहाय्याने निर्धारित केली. मास्कच्या निर्धारित दराबाबत अध्यादेशही काढले. परंतु काही औषध विक्रेते जादा पैश्याचा हव्यासापोटी शासानाच्या अध्यादेशालाच केराची टोपली दाखवित असल्याचे चित्र आहे
मास्क किती रुपयांना विक्री
एन ९५ मास्क-१५०रुपये
तीन पदरी मास्क-१२ रुपये
दोन पदरी मास्क-६ रुपये
२१४ रुपये किमतीचे मास्क १५० रुपयात दिले
धंतोली येथील जय बाबा मेडिकल स्टोअर्सला ‘लोकमत’ चमूने भेट दिली असता ‘प्रिसमास्क एन-९५’ हे २१४ रुपये किमतीचे मास्क १५० रुपयांत दिले. थ्री लेअर मास्क ८ रुपयांत दिले. तशी पावतीही त्यांनी दिली. टू लेअर मास्क त्यांच्याकडे नव्हते. परंतु ते पाच रुपयात विकत असल्याचे त्यांनी सांगितले. मास्कची विक्री करणाऱ्याला शासनाच्या आदेशाबाबत विचारले असता त्याची माहिती नसल्याचे सांगितले. तसेच ज्या किमतीत आले त्याच किमतीत विकत असल्याने किमत कमी करून दिल्याचेही ते म्हणाले.
मास्क किती रुपयांना विक्री
एन ९५ मास्क-३५ रुपये
तीन पदरी मास्क-८ रुपये
दोन पदरी मास्क-४ रुपये
एन ९५ मास्क ३५ रुपयांमध्ये दिले
मेडिकल चौकातील शुभम मेडिकोज औषधी दुकानातून ‘अपना मास्क’ लिहिलेले एन-९५ मास्क ज्यावर किमत १२५ रुपये होती ते ३५ रुपयांमध्ये दिले. थ्री लेअर मास्क आठ रुपयांत तर टू लेअर मास्क चार रुपयांत दिले. येथील जिथेश यांना विचारले असता ते म्हणाले, शासनाच्या अध्यादेशाचे आम्ही पूर्ण पालन करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानुसारच मास्कची विक्री केली जात आहे. एवढ्या कमी किमीत मास्क मिळत असल्याचे म्हटल्यावर अनेक जण स्टोअर करून ठेवतात, म्हणून बाहेर किमतीचा फलक लावलेला नाही.
मास्क किती रुपयांना विक्री
एन ९५ मास्क-३५ रुपये
तीन पदरी मास्क-८ रुपये
दोन पदरी मास्क-४ रुपये
एन ९५ मास्क १०० रुपयांमध्ये दिले
हुडकेश्वर मार्गावरील एका मेडिकल स्टोअर्समध्ये मास्कच्या किंमतीबाबत अक्षरशा: ग्राहकांची लूट असल्याचा अनुभव आला. येथे १९ ते ४९ रुपयात मिळणारे एन ९५ मास्क चक्क १०० रुपयांना असल्याची माहिती फार्मसीच्या संचालकाने दिली. तर थ्री लेअरचे मास्क १६ रुपयांना तर टू लेअर मास्क ६ रुपयांना विकण्यात येत होते. मास्कबाबत शासन निर्णयाची माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या दरात मास्क आले त्याच दरात विकत असल्याची पुष्टीही त्यांनी केली. पूर्वी मास्कच्या किमती अधिक होत्या त्यावेळी किमतीचा फलक लावला होता मात्र आता किंमती कमी झाल्यामुळे फलक लावण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले. त्यांनी पावती दिली नसल्याने त्यांचे नाव घेतलेले नाही.
शासनाच्या दरानुसारच औषध विक्रेत्यांनी मास्कची विक्री करायला हवी. त्यापेक्षा जास्त दरात मास्क विकले जात असतील आणि तसे पुरावे असतील तर संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल.
महेश गाडेकर
सहआयुक्त, औषध प्रशासन