लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळात खबरदारी म्हणून मास्कला सर्वोत्तम उपाय मानले गेले आहे. संक्रमणाच्या प्रसारासोबत ‘दो गज दूरी, मास्क है जरुरी’ हा नारा तयार झाला आहे. गेल्या वर्षभरापासून काही नागरिक दुर्लक्ष करीत असले तरी बहुतांश नागरिक मास्क घालून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आता मास्कमुळे डोकेदुखी, इअर हँगरला पडणाऱ्या खाचा आणि त्यामुळे होणारी आग अशा समस्या वाढायला लागल्या आहेत. एका अर्थाने बायोवेस्ट म्हणूनही मास्क डोकेदुखी ठरत असतानाच प्रत्यक्ष डोकेदुखीचा त्रास आता पुढे यायला लागला आहे.
कोरोना संक्रमणात अनेक आजारांनी काढता पाय घेतला की काय, असे सद्यस्थितीवरून वाटायला लागले आहे. विशेष म्हणजे फारसा त्रास नसेल तर इतर आजारांसाठी लोक डॉक्टरकडे जात नसल्याचे दिसून येत असल्याने ही आभासी स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत मास्क घातल्याने होणाऱ्या समस्यांकडेही दुर्लक्ष व्हायला लागले आहे. कोरोना संक्रमणाच्या प्रारंभिक अवस्थेत मास्कमुळे गुदमरल्यासारखे वाटणे, श्वास घेण्यास अडचणी येणे, बोलताना आवाजाची तीव्रता कमी होणे अशा सर्वसामान्य समस्या बोलल्या जात होत्या. अचानक मास्क घालण्याचे बंधन घातले गेल्याने, ही स्थिती होती. मात्र जसजसे मास्क ही आता दैनंदिन जीवनातील अनिवार्यता बनल्यासारखे झाले आहे. त्यामुळे मास्क घातल्याने होणाऱ्या समस्यांकडेही दुर्लक्ष व्हायला लागले आहे. अशा स्थितीत सर्वसामान्य माणूस मास्क कोणत्या प्रकारचा घालतो, यावर त्या समस्या दिसू लागल्या आहेत.
------------------
मास्कचे प्रकार
इअर हँगर मास्क : या मास्कमुळे कानावर ताण पडतो. दीर्घकाळ घालून असल्यास कानाच्या कप्प्याला खाचा पडतात आणि वेदना होतात. डोकेदुखीचे हे कारण ठरते.
- गाठ बांधता येणारे मास्क : नाक आणि तोंडाला पूर्ण आवरणासह डोक्याला मागे गाठ बांधणे सोपे जाते. मात्र, बरेचदा गाठ सैल पडण्याची शक्यता असते. हा मास्क उत्तम मानला जातो.
- संपूर्ण डोळे वगळता संपूर्ण चेहरा झाकला जाईल असे मास्क : हे मास्क साधारणत: थिप मास्क म्हणूनही ओळखले जातात. युवक वर्गाला हे मास्क आकर्षित करतात.
- फेस शिल्ड : फेस शिल्ड मास्क कपाळापासून ते डोक्यापर्यंत पॅक असतात आणि चेहऱ्यापुढे पारदर्शक प्लास्टिकचे आवरण असते. चेहऱ्याचे रक्षण होण्यासोबत इतरांच्या खोकल्यापासून संसर्ग टाळणे सोपे जाते.
-------------
प्रारंभिक अवस्थेत मास्क घालायला अनेक जण टाळाटाळ करीत होते आणि उठसूठ कारणे पुढे करीत होते. आता संसर्गाचा प्रकोप वाढताच आणि प्रत्येकाच्या मनात धास्ती निर्माण झाल्याने बहुतांश लोक मास्क स्वत:हून घालत आहेत. त्यामुळे मास्कच्या दोऱ्यांनी कानाला पडणाऱ्या खाचा व डोकेदुखीची वास्तविक समस्या घेऊन येणारे फार कमी आहेत. गेल्या वर्षभरात अशी समस्या घेऊन माझ्याकडे एकच रुग्ण आला. नागरिकांनी गाठ बांधता येईल, असे मास्क धारण केल्यास डोकेदुखी व खाचा पडण्याचा त्रास होणार नाही.
- डॉ. आशिष दिसावल, कान-नाक-घसा तज्ज्ञ व माजी अध्यक्ष - आयएमए
.........................