संदीप दाभेकर
नागपूर : उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्याने या शैक्षणिक सत्रात विद्यार्थी सामान्य शाळेची वाट पाहात आहेत; परंतु कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने त्यांच्यात निराशा पसरली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी, आम्ही कोविड परिस्थितीचा आढावा घेत आहोत. कोविडच्या योग्य उपायांसह शाळा उघडू. मास्क अनिवार्य नाही. लवकरच शाळांना नवीन दिशानिर्देश जारी केले जातील. परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले असले तरी नागपुरातील बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांसाठी मास्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नागपूर विभागातील शाळा २७ जूनपासून सुरू होणार आहेत. शाळांनी याची तयारी केली आहे. अद्याप दिशानिर्देश जारी झाले नसले तरी शाळेत विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक करण्याचा निर्णय शाळांनी घेतला आहे. यासोबतच विद्यार्थ्यांचे तापमान तपासणे, सॅनिटायझर व सुरक्षित अंतराच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल. शाळेनुसार सर्व वर्ग एकाचवेळी सुरू करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील. सर्वात अगोदर माध्यमिक वर्ग सुरू केले जातील. त्यानंतर प्राथमिक वर्ग सुरू होतील.
यासंदर्भात सीबीएससीशी संबंधित सोमलवार स्कूल वर्धमाननगर यांनी विद्यार्थ्यांना मास्क घालूनच शाळेत येण्यास सांगितले आहे. शाळेच्या प्राचार्य मीना चव्हाण यांनी सांगितले की, आपल्याला कोविडसोबत जगणे शिकावे लागेल. त्यामुळे गणवेश म्हणून मास्क वापरायला हवा. मास्कमुळे इतर आजार रोखण्यासही मदत होते.
दाभा येथील सेंटर पॉइंट स्कूलचे प्राचार्य प्रवीण कसाद यांनी सांगितले की, वर्ग आठवी ते १२ वीपर्यंतचे वर्ग २० जूनपासून सुरू होतील. आता शाळा सुरू होण्यास दोन आठवड्यांचा अवधी आहे. तेव्हापर्यंत कोरोना संक्रमण परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. सरकारकडून जे दिशानिर्देश जारी होतील, त्याचे शाळेत काटेकोरपणे पालन केले जाईल. शाळेत विद्यार्थ्यांना मास्क वापरायला सांगितले जाईल.
सरस्वती विद्यालयाच्या प्राचार्य जयश्री शास्त्री यांनी सांगितले की, शाळा २७ जूनपासून सुरू होतील. सरकारकडून अद्याप दिशानिर्देश जारी झालेले नाहीत. प्राथमिक वर्ग १ जुलैपासून सुरू होतील. शाळेत सर्व विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.