नागपूर : नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आठव्या माळ्यावर गुरुवारी मसन्या उद हा दुर्मिळ प्राणी आढळून आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. मसन्या उद हल्ला करेल या भीतीने वकील सैरावैरा पळून गेले. दरम्यान, न्यायालय प्रशासनाने वन विभागाला याची माहिती दिली. वन कर्मचारी लगेच न्यायालयात पोहोचले, पण त्यांना मसन्या उदला पकडण्यात यश मिळाले नाही. परिणामी, न्यायालयात दहशतीचे वातावरण कायम आहे.
कोरोना संक्रमणामुळे जिल्हा व सत्र न्यायालयात दीर्घ काळ केवळ तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी झाली. परिणामी, न्यायालयात फार कमी वकील येत होते. त्यातही आठव्या माळ्यावरील वकिलांच्या खोलीमध्ये क्वचितच कुणी जात होते. त्यामुळे या खोलीत मसन्या उदने राहुटी केली. गुरुवारी काही वकील या खोलीत जाऊन बसले असता त्यांना टिनाचे छत व आत लावलेल्या फायबर प्लेट्समधील मोकळ्या जागेत मसन्या उदची शेपटी दिसली. त्यानंतर जवळ गेल्यावर प्रत्यक्ष मसन्या उद दिसल्यानंतर त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी लगेच बाहेर पळ काढून जिल्हा वकील संघटनेचे सचिव ॲड. नितीन देशमुख यांना माहिती दिली. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मसन्या उदला पकडण्याचे प्रयत्न केले, पण तो त्यांच्या हाताला लागला नाही. टिनाचे छत व आतील फायबर प्लेट्सदरम्यान मोठी मोकळी जागा असल्यामुळे मसन्या उद आत शिरून दडून बसला. काही वेळानंतर पाऊस सुरू झाला व अंधारही पडला. परिणामी, मसन्या उदला पकडण्यासाठी अधिक प्रयत्न करता आले नाही. तो बाहेर आल्यास पकडला जावा, याकरिता सापळा रचून ठेवण्यात आला आहे. त्याचाही फायदा न झाल्यास शुक्रवारी पुढील आवश्यक उपाय केले जातील.
-----------------
गेल्या दोन वर्षातील दुसरी घटना
जिल्हा न्यायालयात मसन्या उद आढळण्याची ही गेल्या दोन वर्षातील दुसरी घटना होय. यापूर्वी दिसलेल्या मसन्या उदला पकडण्यात अपयश आले होते. त्यानंतर तो कुठे गेला हे कुणालाच कळले नाही. त्यामुळे हा मसन्या उद सापडावा असे वकिलांना वाटत आहे.