लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर एकाच रात्री दोन वेळा सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. २९ जुलैच्या रात्रीची ही घटना असून, शहर पोलिसांत खळबळ उडाली आहे. सीताबर्डी पोलिसांनी सूत्रधार ऑटोचालकासह चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये मो. शाहनवाज ऊर्फ साना मो. रसीद (२५), मासूम शाह तकिया, मो. तौसीफ मो. युसूफ (२६), मो. मुशीर (२३) बकरामंडी, मोमीनपुरा व अन्य एक आरोपी आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
पीडिता १७ वर्षीय अल्पवयीन असून गरीब कुुटुंबातील आहे. वहिनीने रागवल्याने ती २९ जुलै रोजी रात्री घराबाहेर पडली. मेडिकल चौकातून तिने एका ओळखीच्या ऑटोचालकाला सीताबर्डी सोडण्यास सांगितले. त्याने तिला मानस चौकात सोडून दिले. तिथे या प्रकरणाचा सूत्रधार ऑटोचालक साना याची तिच्यावर नजर पडली. त्याने मदतीचा हात पुढे करून तिला ऑटोत बसविले व मोमिनपुऱ्यात घेऊन गेला. दरम्यान तिला दारूसुद्धा पाजली. तिला एका खोलीत घेऊन गेला व तीन मित्रांना पुन्हा बोलाविले. आरोपी सानासह अन्य तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला पुन्हा मेयो रुग्णालयासमोर सोडून दिले. तिथे दोन ऑटोचालकांची तिच्यावर नजर पडली. त्यांनी सुद्धा तिच्यावर सामूहिक अत्याचार केला व फरार झाले. ती मेयो रुग्णालय चौकात मदत मागत होती. दरम्यान दोघांनी आपल्या गाडीवर तिला रेल्वे स्टेशनवर सोडून दिले.
रात्री उशिरा जीआरपीच्या गस्त घालणाऱ्या पथकाला ती रेल्वे स्टेशनवर आढळली. त्यांनी तिला महिला बालगृहात पाठविले. तिथे बाल कल्याण समितीपुढे अत्याचार झाल्याचे सांगितले. समितीच्या सूचनेनुसार जीआरपीने तिचा बयाण नोंदवून घेतला. तपासात शाहनवाज ऊर्फ साना याची माहिती मिळाली. जीआरपीचे एपीआय ओमप्रकाश भलावी यांच्या पथकाने साना व दोन आरोपींना अटक केली. रविवारी सायंकाळी सीताबर्डी पोलिसांना सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच प्रभारी डीसीपी विवेक मसाळ तसेच एसीपी तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी तपास सुरू केला. सीताबर्डी पोलिसांनी चवथ्या आरोपीलाही अटक केली. त्यांच्यावर बलात्कार, पोक्सो, अपहरण, अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हे दाखल केले.
- पीडितेवर दुसऱ्यांदा झाला अत्याचार
पीडित मुलीवर यापूर्वीही सामूहिक अत्याचार झाला आहे. यापूर्वी तिच्यावर इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्याचार झाला होता. अनेक दिवस महिला बालगृहात राहिल्यानंतर ती घरी परतली होती; परंतु घरच्यांचा तिच्यासोबत नेहमीच वाद होत होता. घटनेतील चार आरोपी ऑटोचालक आहे. तर दोन कुली असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व रेल्वे स्थानकावरून व्यवसाय करतात.