नागपूर (नरेश डोंगरे): नागपूर-अमरावती महा महामार्गालगतच्या धामना गावाजवळ असलेल्या चामुंडी एक्सप्लोसिव प्रा. ली. कंपनीत गुरुवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यामुळे चार महिला कामगारांसह पाच जणाचा जागीच मृत्यू झाला. तर चार गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत आणि शोक संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. ही कंपनी नेरी ग्रामपंचायत क्षेत्रात येते.
नागपूर अमरावती महामार्गावर नागपूर पासून 25 किलोमीटर अंतरावर धामना हे गाव असून येथे बारूद तसेच फटाक्याच्या वाती निर्माण केल्या जातात. कंपनीत नेहमीप्रमाणे आज सकाळपासून बारूद पॅकिंग व हाताळणीचे काम सुरू असताना दुपारी 1 वाजताच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला आणि त्यात आत मधील सर्वजण गंभीर जखमी झाले. मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूच्या गावातील हजाराच्या संख्येत नागरिक या स्फोटाच्या कारखान्याकडे धावले. त्यांनी जखमींची मदत करण्याचे प्रयत्न केले. रुग्णवाहिका घटनास्थळी बोलवून सर्व जणांना नागपूरला रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल त्यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचा ताफा आणि स्फोटक विशेषज्ञ पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
मृताची नावे -
1) प्रांजली किसना मोदरे (22) रा. धमना
2) वैशाली आनंदराव शिरसागर ( 21) रा. धमना
3) प्रांजली श्रीकांत फलके (21) रा. धमना
4) मोनाली शंकर अलोने (27) रा. धमना
5) पन्नालाल बंदेवार ( 69) रा. सातनवरी
जखमीची नावे -
1) शीतल चटप ( 30) रा. धामना
2) दानसा मरस्कोल्हे ( 26) रा.मध्यप्रदेश
3) श्रद्धा पाटील ( 22) रा. धामना
4) प्रमोद चवारे ( 25) रा. नेरी.