लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणपती उत्सवाच्या काळात गेल्या दहा वर्षापासून पीओपी मूर्ती विक्रीच्या विरोधात कारवाई सुरू आहे. परंतु यावर्षी कारवाई संदर्भात प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. नुकताच महापौरांनी गणेश उत्सवासंदर्भात गणेश मंडळ आणि स्वयंसेवी संस्थांची बैठक घेतली. या बैठकीत सुद्धा पीओपी मूर्तीवर कारवाईचा मुद्दा चर्चेत आला होता. परंतु महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप पीओपी मूर्ती विरोधी कृती समितीने केला आहे. त्यामुळे यंदा सर्रास पीओपीच्या मूर्ती बाजारात विकल्या जाण्याची भीती समितीने वर्तविली आहे.२०१२-१३ पासून पीओपीच्या मूर्ती विक्रीवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेने पीओपी मूर्ती विक्री संदर्भात स्वत:ची नियमावली बनविली आहे. पीओपी मूर्तीमुळे तलावाचे प्रदूषण वाढत असल्याने महापालिकेने आखलेल्या नियमात मूर्तीची विक्री करायची आहे. यात मूर्तीच्या मागे लाल रंग लावायचा आहे. बॅनर लावून अणि मनपाकडून परवानगी घेऊन मूर्तीची विक्री करायची आहे. विक्री करताना लोकांना मूर्ती पीओपीची असल्याचे सांगायचे आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या मूर्ती विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई प्रशासन करते. परंतु यावर्षी महापौरांनी घेतलेल्या बैठकीत पीओपी मूर्ती विरोधी कृती समितीने बैठकीत विचारणा केली असता, महापौरांनी त्यासंदर्भात कुठलाही खुलासा केला नसल्याचे समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. गणेश उत्सव तोंडावर आला आहे. गणपती विक्रीसाठी दुकाने सजली आहे. अशात पीओपीच्या मूर्तीची दुकानेही मोठ्या प्रमाणात लागली आहे. प्रशासनाने कारवाई न केल्यास, रस्त्यावर उतरण्याचा इशारा समितीचे संयोजक नितीन माहुलकर, गोविंद वरखडे, अनिल कोटांगळे, सुमेध गाठे, अमित देवारे यानी दिला आहे.
नागपुरात पीओपी मूर्तींची बाजारात सर्रास विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:15 AM
गणेश उत्सव तोंडावर आला आहे. गणपती विक्रीसाठी दुकाने सजली आहे. अशात पीओपीच्या मूर्तीची दुकानेही मोठ्या प्रमाणात लागली आहे.
ठळक मुद्देकारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष पीओपी मूर्ती विरोधी कृती समितीचा विरोध