नागपूर : चनकापूर (ता. सावनेर) शिवारातील शंकरराव चैतूजी गुडधे यांच्या फार्म हाउसमधील दराेडा प्रकरणात खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांच्या पथकाने दाेघांना मंगळवारी (दि. २४) लाखनी (जिल्हा भंडारा) येथून अटक करीत दाेन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, यातील एक विधिसंघर्षग्रस्त बालक या दराेड्याचा ‘मास्टर माइंड’ आहे. दराेड्याची ही घटना गुरुवारी (दि. १९) घडली हाेती. या दराेडेखाेरांकडून एक प्लेझर जप्त करण्यात आल्याची माहिती ठाणेदार हृदयनारायण यादव यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या आराेपी दराेडेखाेरांमध्ये अनिल डाेमाजी ब्राह्मणकर (२३, रा. वाॅर्ड क्रमांक-२, साईनगर, चनकापूर, ता. सावनेर) व अभिषेक ऊर्फ मुस्टीभगवानदिन वर्मा (१९, रा. चनकापूर, ता. सावनेर) या दाेघांचा समावेश असून, याच प्रकरणात चनकापूर, ता. सावनेर येथील रहिवासी दाेन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या चाैघांनी गुरुवारी शंकरराव चैतूजी गुडधे (९०, रा. चनकापूर, ता. सावनेर) यांच्या फार्म हाउसमध्ये प्रवेश केला. शंकरराव गुडधे यांच्यावर चाकू राेखून त्यांच्या डाेळ्यांना पट्टी बांधली. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून दाेन हजार रुपये राेख, १० हजार रुपये किमतीचा साेन्याचा दागिना व एक हजार रुपये किमतीचा माेबाइल फाेन असे एकूण १३ हजार रुपये किमतीचे साहित्य हिसकावून घेत ते लुटून नेले.
या घटनेत अनिल ब्राह्मणकरचा सहभाग असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी त्याच्या शाेधात लाखनी गाठले. तिथून पाेलिसांनी अनिल व अभिषेकसह अन्य दाेन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्या चाैघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याचे पाेलिसांनी सांगितले. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, हवालदार उमेश ठाकरे, आशिष भुरे, प्रमाेदा भाेयर, राजू भाेयर, नुमान शेख यांच्या पथकाने केली.
दाेघेही १५ वर्षे वयाचे
या प्रकरणात खापरखेडा पाेलिसांनी दाेन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले असून, दाेघेही १५ वर्षे वयाचे व चनकापूर, ता. सावनेर येथील रहिवासी आहे. यातील एक या दराेड्याचा ‘मास्टर माइंड’ असून, ताे खापरखेडा परिसरात ‘जंगली’ नावाने परिचित आहे. त्यांच्याकडून एमएच-४० सीडी-५६७७ क्रमांकाची प्लेझर जप्त करण्यात आली. खापरखेडा परिसरातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये विधिसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असताे. गंभीर गुन्ह्यांमधील त्यांचा वाढता सहभाग धाेकादायक आहे.