रघुवीर जोशीनागपूर: आज पुरुषोत्तम दारव्हेकर यांची पुण्यतिथी (२१ सप्टेंबर). त्यांचा जन्म १ जून १९२६ रोजी नागपूर येथे झाला. ते एम.ए.(मराठी), एल.एल.बी., बीएसी., बी.टी. पर्यंत सर्व परीक्षांमध्ये सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. त्यांनी आम्हा सगळ्या बालकलाकारांना सोबत घेऊन १९५० च्या विजयादशमीला रंजन कलामंदिरची स्थापना केली. संस्थेच्या अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम दारव्हेकर होते.त्यावेळेस आम्ही बालकलाकार लोहारकर भगिनी, जोशी बंधू-भगिनी, आखेगावकर भगिनी, गोपाळ कौशिक, अरुण माणकेश्वर, चंद्रकांत नायक, सुहास पेंडसे, भास्कर आणि वामन वाटेगावकर बंधू, किशोर प्रधान, रमेश अंभईकर, रघुवीर जोशी सभासद मंडळी होतो. त्यांनी भाऊ-बहिणीची कथा, नाट्य, लावण्या, छोटी छोटी नाटके लिहून आम्हाला सोबत घेऊन सादर केले. ही नाटके गणपती उत्सवांमध्ये स्टेजवर सादर करण्यात येत. गावोगावी त्यांचे कार्यक्रम होत असत.त्या कार्यक्रमांचे लेखन व गाण्यांच्या चाली स्वत: मास्तर अर्थात पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे असायचे. गोपाळ आणि वादनाचे काम वाडेकर बंधू करत. त्यांचे लिखाण साहित्य लहान मुलांपासून ते मोठ्या राजकारण्यांपर्यंत निरनिराळ्या गटाला शोभेल व त्यातून बोध मिळेल असे होते. उदा. पाच ते दहा वर्ष वयोगटातील मुलांकरिता शिवबा, बाहुलीचं ऑपरेशन, मंगळवार स्वारी, आबरा का डाबरा, मोरूचा मामा, वर पाहिजे देवाचा, वंदन गीत अशी अनेक नाटके त्यांनी लिहिली आणि सादर केली. किशोरावस्थेतील मुलांसाठी पोवाडे, लावणी, परिकथा, कथा, नाट्यछटा, कविसंमेलन आणि राजकारणावर करारावर आयुब निघाला तास्कंदला, वल्लभभाई पटेल यांचा मृत्यू, प्रभू तू आज केले आम्हा अनाथ अशी गाणी व प्रहसन त्यांनी लिहिली.असे अनेक कार्यक्रम त्यांनी आम्हा बालकलाकारांना घेऊन गणपती उत्सव, मेळावे, आकाशवाणी किंवा अनेक ठिकाणी गावांमध्ये स्टेजवर सादर केले. हळूहळू त्यांनी यातून लक्ष काढून घ्यायचं ठरवलं आणि ते मुंबईकरांसोबत मोठी नाटके दिग्दर्शित करण्यात रमले. काळी माती खरे पाणी, माणसं, कट्यार काळजात घुसली, अश्रूंची झाली फुले आदी. यात भाग घेणारे कलाकार नागपूरचे होते. राजा पाठक, त्र्यंबक काळे, विश्वास काळे, गणेश सोळंकी, नलिनी शर्मा, ज्योत्स्ना पोद्दार असे अनेक कलावंत होते. त्यांनी एकदा आम्हाला आव्हान दिलं आणी म्हणाले मी इतकी वर्ष तुम्हाला शिकवलं. आता मला गुरुदक्षिणा म्हणून एकच गोष्ट करून दाखवा. ते म्हणजे तुम्ही सगळ्यांनी स्वत:च्या भरोशावर एक स्टेज प्रोग्राम करून दाखवा तर मी म्हणेन की तुम्ही माझे खरे सहकारी आहात.ते आव्हान आम्ही स्वीकारले आणि तीन तासाचा कार्यक्रम आम्ही मोर भवन नागपूर इथे सादर केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मास्तरांना बसवून, त्यांच्याकडून शाबाशकी मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यवस्थेत आमच्याकडून काही चुका झाल्या. त्या चुकाही त्यांनी मस्करीत भाषणातून बोलून दाखवल्या. जसे आजचा कार्यक्रम पूर्णपणे मुलांनी केला आहे. हे कसं सांगू? अहो हा बघा टेबलावरचा टेबल क्लॉथ हा एक पंचा आहे. प्रेक्षकांमधून हशा पिकला. गडबडीत आपण काय करतो आहोत, हे मुलांना कळलंच नाही असे म्हणत मुलांच्या परिश्रमाचे चीजही त्यांनी केले. अशाप्रकारे रंजन कलामंदिर नाट्यसंस्था नावारूपाला येत असताना मास्तर मुंबईच्या व्यावसायिक नाटकांकडे गेले आणि ते वारंवार मुंबईला जाऊ लागल्यामुळे रंजन कलामंदिर हळूहळू दुर्लक्षित झाले.मुले मोठी झाली. नोकरीच्या निमित्ताने इकडे तिकडे गेले. मुलींची लग्न झालीत. त्या आपल्या घरी गेल्या आणि हळूहळू संस्थेचे कार्य मागे पडायला लागले. काही लोकांनी रंजन नावाचा फायदा घेऊन काही संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला. पण रंजन कला मंदिराशी त्याचा काहीही संबंध नव्हता. कारण पूर्वीच्या मूळ सभासदांपैकी त्यात कुणीही नव्हते.मास्तरांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नागपूर येथील कुर्वेज न्यु मॉडेल हायस्कूल, सुळे हायस्कूल आणि हडस हायस्कूल येथे शिक्षकी नोकरी पत्करली. नंतर नागपूर आकाशवाणीवर १९५४ ते १९६० पर्यंत नोकरी केली. पुढे ते प्रोड्यूसर झाले आणि मुंबई आकाशवाणीला प्रोग्रॅम हेड झाले. तेथे त्यांनी हिंदीमध्ये अनेक कार्यक्रम केले. मास्तर म्हणूनच त्यांची ओळख होती. त्यांना लहाणपणापासूनच नाटकांचे वेड होते. १९५० मध्ये रंजन कला स्थापन केली. तेव्हा त्यांची प्रारंभीची नाटके उपाशी, कोरा कागद, रिमझिम ही होती.पुढे १९६१ मध्ये दिल्लीला गेले. त्यानंतर त्यांच्या नाटकांचे प्रकाशनही झाले. कल्पनेचा खेळ, चंद्र नवरीचा झाला, माणसं, पृथ्वी गोल आहे, नयन तुझे जादूगार, घनश्याम नयनी आला, कट्यार काळजात घुसली अशा नाटकांचा त्यात समावेश होतो. कट्यारने रंगभूमीला वेगळे वळण दिले. आजही या नाटकाचे प्रयोग होत आहेत. या नाटकावर आधारित मराठी चित्रपटही निर्माण झाला आणि रसिकांनी तो डोक्यावर घेतला. नाट्यसंपदा या संस्थेने त्यांनी अनेक नाटके रंगभूमीवर आणली. मराठी भाषेतील महत्त्वाचे वि.वा. शिरवाडकरांचे नाटक नटसम्राटचे त्यांनी दिग्दर्शन केले.मराठी रंगभूमीला समृद्ध करणाऱ्या आणि वेगळे वळण देणाऱ्या पुरुषोत्तम दारव्हेकरांचे निधन २१ सप्टेंबर १९९९ रोजी झाले.
मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे मास्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 9:30 AM