नागपूर : बिहार राज्यातील भागलपूर बॉम्बस्फोटाच्या सूत्रधाराला अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. मो.तनवीर असगर (३२, भागलपूर, बिहार) असे या आरोपीचे नाव असून, तो भागलपूर पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता. त्याला तहसील पोलीस ठाण्यातील पथकाने मोमीनपुऱ्यातील भानखेडा परिसरातून पिस्तूल व काडतुसांसह जेरबंद केले.
वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादातून तनवीरचे वडील आणि चुलत भावाची १९९२ मध्ये हत्या झाली होती. तेव्हापासून तनवीर आरोपीचा बदला घेण्याच्या तयारीत होता. आरोपींकडून बदला घेणे शक्य नसताना तनवीरने बॉम्बस्फोट करून आरोपी आणि त्यांची संपत्ती नष्ट करण्याची योजना आखली. २०१७ मध्ये त्याने साथीदारांच्या मदतीने गावठी स्फोटकांचा वापर करून आरोपीच्या घराजवळ स्फोट घडवून आणला. या स्फोटात काही लोक जखमी झाले, तर दुकाने आणि घरांचे नुकसान झाले.
भागलपूर पोलिसांनी तनवीरविरोधात स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. जवळपास वर्षभर फरार राहिल्यानंतर त्याला भागलपूर पोलिसांनी पकडले. वर्षभरापूर्वीही तनवीर भागलपूर पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता. त्यावेळीही नागपूर पोलिसांनी भानखेड्यातच पकडले होते. १७ मे रोजी भागलपूर पोलीस तनवीरला कारागृहातून न्यायालयात नेत होते. यावेळी तो फरार झाला, तेव्हापासून भागलपूर पोलीस त्याचा शोध घेत होते. मंगळवारी रात्री तहसील पोलिसांना तनवीर भानखेडा येथे राहणाऱ्या त्याच्या प्रेयसीच्या घरात लपल्याची माहिती मिळाली. त्याआधारे तहसील पोलिसांनी मैत्रिणीच्या घरी छापा टाकला. तेथे तनवीर पोलिसांच्या हाती लागला. त्याची झडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे आणि मोबाइल सापडला. पोलिसांनी शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तनवीरला अटक केली.
प्रेयसीच्या आठवणीमुळे नागपूरकडे धाव
तनवीरने पोलिसांना सांगितले की, त्याच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा काही दिवसांत निकाली निघणार होता; पण प्रेयसीच्या खूप आठवणीमुळे तो पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. मागील वेळीदेखील प्रेयसीकडूनच त्याला ताब्यात घेतले होते. ही कारवाई तहसीलच्या पीआय तृप्ती सोनवणे, विनायक गोल्हे, पीएसआय परशुराम भवाळ, शंभूसिंह किरार, प्रमोद शनिवारे, यशवंत डोंगरे, पंकज बागडे, पंकज निगम यांच्या चमूने केली.
फेसबुकवरून पोलिसांना दिले होते ‘चॅलेंज’
२०१७ साली बॉम्बस्फोट केल्यानंतर तनवीर फरार झाला होता. त्याने त्यावेळी भागलपूर पोलिसांना चक्क ‘फेसबुक’च्या माध्यमातून ‘मला पकडून दाखवाच’ असे ‘चॅलेंज’ दिले होते.