नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सावलीसारखी साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा दीक्षाभूमीवर उभारण्यात आला. मंगळवारी रमाई जयंतीनिमित्त या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेसह विविध संघटनांनी दीक्षाभूमीवर रमाई आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा, ही मागणी लावून धरली होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीने सुद्धा ही मागणी मान्य केली होती. अखेर मंगळवारी रमाई जयंतीदिनी दीक्षाभूमीच्या मध्यवर्ती स्मारकामध्ये उभारण्यात आलेल्या रमाई यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी रमाई आंबेडकर संस्थेतर्फे दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्यांना रमाईचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, एन. आर. सुटे, विलास गजघाटे, भन्ते नाग दीपांकर, राजकुमार वंजारी, आर. व्ही. सिंग, गौतम मोरे, महेंद्र मडामे, वंदना निकाेसे, प्रगती पारसी, गायत्री सिंग, आशा मडामे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.