काटाेल/माैदा : काटाेल व माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माेबाईल टाॅवरचे साहित्य चाेरून नेणाऱ्या दाेन अट्टल चाेरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर शहरातील सिद्धेश्वर नगर, चिखली येथून ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, ही कारवाई मंगळवारी (दि. १) करण्यात आली.
शुभम वसंता खराबे (२७, रा. डाेंगरगाव, ता. माेहाडी, जिल्हा भंडारा) व कार्तिक नरेश खुरंगे (२१, रा. सर्वज्ञ साेसायटी, हुडकेश्वर राेड, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या चाेरट्यांची नावे आहेत. काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पारडसिंगा व झिल्पा तसेच माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भूगाव व सावळी फाटा येथील माेबाईल टाॅवरच्या डीयूआर व आरयूएस कार्ड तसेच काॅपर केबल चाेरीला गेल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे या घटनांचा समांतर तपास करायला सुरुवात केली हाेती.
दरम्यान, या चाेरीत शुभम खराबे सहभागी असल्याचे तसेच ताे नागपूर चिखली भागात वावरत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावळा रचून शिताफीने शुभम व त्याचा साथीदार कार्तिकला ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देताच त्यांना अटक केली. शिवाय, या दाेघांचाही चार गुन्ह्यांमध्ये सहभाग असून, त्यांच्याकडून सात नग डीयूआर व आरयूएस कार्ड आणि १५ किलाे काॅपर केबल असा एकूण १ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार व जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक जावेद शेख, हवालदार नाना राऊत, दिनेश आधापुरे, अमाेल वाघ, विपीन गायधने, राेहन डाखाेरे, नम्रता बघेल, सतीश राठाेड, अमाेल कुथे यांच्या पथकाने बजावली.